पिंपरीच्या स्थायीतील राष्ट्रवादीचे सदस्य आता दुहेरी कचाट्यात 

स्थायीतील टक्केवारी तथा लाचखोरी हे उघड राज्यभरातील महापालिकांमधील गुपित आहे.
पिंपरीच्या स्थायीतील राष्ट्रवादीचे सदस्य आता दुहेरी कचाट्यात 
Pimpri-Chinchwad .jpg

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या स्थायी समितीतील टक्केवारी तथा लाचखोरीचे प्रकरण गेल्या महिन्यात १८ तारखेला उघडकीस आले. त्यात भाजपचे (BJP) स्थायीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगेंसह (Nitin Landage) चार कर्मचाऱ्यांना अटक झाली. नुकतेच (ता.३० ऑगस्ट) ते जामीनावर सुटले. यामुळे भाजपने व स्थायीतील सदस्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र, तपास आता खरा सुरु होणार असून स्थायीतील इतर सर्वपक्षीय १५ सदस्यांचीही चौकशी होणार असल्याचे या प्रकरणाच्या तपासाधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) उपअधिक्षक (डीवायएसपी) सीमा मेंहदळे यांनी 'सरकारनामा'ला सांगितल्याने आता त्या १५ जणांचे धाबे दणाणले आहेत. (15 members of the standing committee will also be questioned) 

दरम्यान, याप्रकरणी स्थायीतील पक्षाच्या चौघा सदस्यांपैकी कोणी दोषी आढळला, तर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. असे शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थायीतील सदस्य दुहेरी कात्रीत सापडले आहेत. तर, भाजप, शिवसेना आणि अपक्ष स्थायी सदस्यांचीही एसीबी चौकशी होणार असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच सांगितले आहे. 

मात्र, ती अद्याप झालेलीच नाही. त्यामुळे त्यांचे हे आश्वासन म्हणजे गाजर ठरले असल्याची चर्चा रंगली आहे. कारण चार दिवस पोलिस कोठडीत काढूनही स्थायी समिती अध्यक्षांचा त्यांनी राजीनामा सुद्धा घेतलेला नाही. उलट जामीनावर सुटताच (ता.३०) दोन दिवसांतच त्यांनी स्थायीची बैठक घेऊन कोट्यवधी रुपयांचे विषयही मंजूर केले आहेत. दरम्यान, या टक्केवारीप्रकरणी स्थायीच्या उर्वरित १५ सदस्यांची चौकशी होणार असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे सर्वपक्षीय सद्सय गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थायीतील टक्केवारी तथा लाचखोरी हे उघड राज्यभरातील महापालिकांमधील गुपित आहे. मात्र, पिंपरीत ते प्रथमच एका तरुण शीख जाहिरात ठेकेदारामुळे समोर आले. त्यांच्या मंजूर सहा होर्डिंग्ज ठेक्यासाठी ठेका रकमेच्या तीन टक्के लाच मागून दोन टक्के घेण्यात आली. त्यातून पिंपरी पालिकेतील स्थायीच्या टक्केवारीवर जाहीर शिक्कामोर्तब झाले. कंत्राट रकमेच्या किमान तीन टक्के लाच घेतली असल्याचे स्पष्ट झाले. 

गेल्या साडेचार वर्षात अंदाजे किमान नऊ हजार कोटी रुपयांचे विषय स्थायीने मंजूर केले आहेत. म्हणजे फक्त टक्केवारीत दोनशे सत्तर कोटी रुपये घेण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यात प्रत्येक स्थायी सदस्याचा वाटा असतो, हा अलिखीत नियम आहे. तशी वर्षानूवर्षाची प्रथाच पडलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचेही सदस्य त्यात सामील आहेत. हे ही उघड गुपित आहे. त्यापैकी एकानेही आतापर्यंत आपण दोषी नसल्याचे जाहीरपणे सांगितलेलेही नाही. त्यामुळे खरंच त्यांच्यावर तिन्ही पक्ष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना कारवाई होणार करणार का, हाच खरा प्रश्न आहे. तशी चर्चा आहे. अजितदादांनीच ती करू असे सांगितल्याने ती होईल. असाही दुसरा मतप्रवाह आहे. ती झाली, तर नाईलाजास्तव भाजपच नाही, तर शिवसेनेलाही ती निवडणुकीच्या तोंडावर करावीच लागणार आहे.  

Edited By - Amol Jaybhaye
 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in