....तर रेमडेसिव्हिरसाठी सुजय विखेंचाच नंबर दिला असता : जयंत पाटलांचा टोला - .... Sujay Vikhe's number would have been given for Remdesivir: Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

....तर रेमडेसिव्हिरसाठी सुजय विखेंचाच नंबर दिला असता : जयंत पाटलांचा टोला

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

 

विखे यांचे इंजेक्शन प्रकरण गंभीर आहे.

पुणे : रेमडेसिव्हिरची इंजेक्शन राजकीय नेतेमंडळीच घेऊन बसू लागेल. अशाप्रकारे इंजेक्शन घेऊन आमदार, खासदारच  वाटायला लागले तर वैद्यकीय व्यवस्थेत अडथळा निर्माण होईल. कोणतेही काम राजकीयदष्ट्या प्रेरित होऊन करणे, हे अयोग्य आहे, असे वक्तव्य करत ‘आधी कळलं असतं, तर रेमडेसिव्हिरसाठी खासदार सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना लगावला आहे.

पुण्यात कात्रज भागात साकारलेल्या ८० बेडच्या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. विखे यांचे इंजेक्शन प्रकरण गंभीर असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कारवाईचे आदेश दिले आहेत, असेही पाटील यांनी म्हटले.

देशभरात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लसीकरण सुरु होत आहे, त्यावर पाटील म्हणाले, ‘‘१२ कोटी लोकसंख्येला लवकरात लवकर लसीकरण केल्यास कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. जनतेला लस सहज उपलब्ध व्हावी, हा हेतू असून मोफत लसीबाबत तीनही पक्षाच्या नेत्यांशी विचार करुन निर्णय घेतला जाईल. लस उपलब्ध होतेय, तसतसे लसीकरण होत आहे, यंत्रणा चांगलं काम करत आहे. विविध जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा दर आठवड्याला घेत असून लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होते आहे'.

पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करत पाटील म्हणाले, या निवडणूक प्रक्रियेवरून मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे. विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला आणखी ४ महिन्यांचा कालावधी वाढवून द्यायला हवा होता. निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलायला हवी होती. मात्र कुंभमेळा टाळता आला असता, आपण त्यातच जास्त गर्क होतो'

काहीतरी बोलायचे म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात

चंद्रकांत पाटील हे नेहमीच खरं कुठे बोलतात? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, ‘‘आमच्या सगळ्या पक्षांचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातच आहेत. तसेच अजितदादांवर सर्व जिल्ह्यांची जबाबदारी आहे. काहीतरी बोलायचं म्हणून चंद्रकांत पाटील बोलत असतात. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे पुण्यात येऊन लढले. यामुळे पुण्यासाठी काहीतरी करतोय, हे दाखवण्यासाठी ते अजित पवारांवर टीका करत असतात, त्याकडे पुणेकरांनी लक्ष देऊ नये.’’

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख