सदाभाऊ खोतांबरोबर एकत्र येण्याबाबत राजू शेट्टी म्हणतात...  - Former MP Raju Shetty criticizes Sadabhau Khot | Politics Marathi News - Sarkarnama

सदाभाऊ खोतांबरोबर एकत्र येण्याबाबत राजू शेट्टी म्हणतात... 

मिलिंद संगई 
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्रीही वीजबिल भरा असे म्हणू लागले आहेत.

बारामती : आमदार सदाभाऊ खोत आणि तुमच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहात का? या प्रश्‍नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी "मी असंगाशी संग करत नाही' या एका वाक्‍यात सदाभाऊ खोत हा विषय आपल्यासाठी संपल्याचे सांगून टाकले. 

बारामतीच्या न्यायालयात 2012 च्या माळेगाव कारखान्यावर केलेल्या आंदोलनाप्रकरणी सुनावणीसाठी मंगळवारी (ता. 2 फेब्रुवारी) राजू शेट्टी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

ते म्हणाले "वापरण्यात आलेल्या विजेपेक्षा जास्तीची बिले शेतकऱ्यांना पाठवण्यात आली आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आम्ही पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे. महावितरणचे अधिकारी या चुका कबूल करत आहेत. पण, बिलांची दुरुस्ती काही होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात थकबाकी दिसते आहे.'' 

"महावितरणकडून अनेक बेकायदेशीर गोष्टी होत आहेत. शेतकऱ्यांनी जास्त वीज वापरली आहे, असे दाखवून सरकारकडून जादाचे अनुदान लाटण्याचे काम होत आहे. सत्यशोधन समितीत हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. महावितरणनेही ही बाब मान्य केली असून जादाच्या अनुदानाचा अद्याप हिशेब होणे बाकी आहे,'' असेही त्यांनी नमूद केले. 

"महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना जी वीजजोडणी दिली आहे, अनेक ठिकाणी मीटरच बंद आहेत. मीटर बंद असूनही त्यांनी अश्वशक्तीने वीज वापरली, असे दाखवून शेतकऱ्यांवर वीजबिले लादली आहेत. अनेक ठिकाणी विहिरी किंवा विंधनविहीरींना पाणीच नाही, तेथे वीजच वापरली नसतानाही खोटी बिले देण्यात आली आहेत. ज्यांच्याकडे पाच अश्वशक्तीचे कृषीपंप आहेत, त्यांना सात अश्वशक्तीच्या पंपाची बिले दिली गेली आहेत,'' असा आरोप शेट्टी यांनी केला. 

लोकांनी कोठून पैसे आणायचे? 

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात लॉकडाउनच्या काळातील वीजबिल सरकारने माफ करावे किंवा त्या बिलाची रक्कम सरकारने महावितरणला द्यावी, अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली. तीन महिन्यांचे बिल माफ करा, पुढचे भरायला लोक तयार आहेत, ही लोकांची भूमिका चुकीची नाही, दिवाळीत गोड बातमी देतो, असे म्हणणारे ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्रीही वीजबिल भरा असे म्हणू लागले आहेत, लोकांनी कोठून पैसे आणायचे? असा सवाल शेट्टी यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख