कोथरूडमध्ये अडकलो नसतो तर जयंतरावांची सुटीच करून टाकली असती - Chandrakant Patil's criticism on Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

कोथरूडमध्ये अडकलो नसतो तर जयंतरावांची सुटीच करून टाकली असती

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

त्यांच्याविरोधात ८० हजार लोकांनी मतदान केले आहे, त्यांनी विसरू नये.

पुणे  ः ‘भारतीय जनता पक्षाने मला कोथरूडमध्ये लढायला सांगितले, त्यामुळे मी तेथे अडकून पडलो. मला पक्षाने कोथरूड लढवायला सांगितले नसते तर गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतच जयंत पाटील यांची सुटी केली असती,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे सभा घेतली. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले की, ‘जयंत पाटील हे राज्याचे आणि सांगली जिल्ह्याचे नेते नसून तालुक्याचे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमच्या पक्षात तीन गट पडले नाहीआणि थोडा घोळ झाला नाही तर तुम्हाला कायमचे घरी बसविले असते. त्यांच्याविरोधात ८० हजार लोकांनी मतदान केले आहे, त्यांनी विसरू नये, त्यामुळे जयंत पाटलांनी माझी मापं काढण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललंय ते पाहावे.’

‘आता पदवीधरची निवडणूक आहे, त्यावर बोला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी इतर बघूया, आता मी कुठे जात नाही. हे भाजपचे नेते कसे भांडतात, ते बघतो आणि तुम्हाला इथं कसं जेरीस आणायचं, हे मला माहीत आहे. मला जर पक्षाने पुण्यात नेवून ठेवले नसते. माझ्या निवडणुकीत मी जर अडकलो नसतो, तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुमची सुटी करून टाकली असती,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर केली. 

या वेळी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की लाड यांचे वय ७३ आहे, त्यांना मतदारसंघातील पाच जिल्ह्यात फिरतानाच दमछाक होते. त्यांचे वय पाहता त्यांना विधान परिषदेवर पाठवायचे होते ना. पण नाही त्यांची सुटी करायची, असे यांचे ठरलेले दिसते. तुम्हाला उमेदवारी दिली, हे दाखविण्यासाठी अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे.

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख