धक्कादायक : लोणीकंदमधील भरदिवसा गोळीबारात `गोल्डमॅन`चा खून - Young man shot dead in Pune district | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : लोणीकंदमधील भरदिवसा गोळीबारात `गोल्डमॅन`चा खून

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

पुणे-अहमदनगर महामार्गावरील लोणीकंद येथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे : पुणे-नगर महामार्गावरील लोणीकंद येथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारात सचिन शिंदे (29 वर्ष) याचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी सचिन शिंदे याच्या डोक्यात गोळी झाडल्याने त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

या बाबतची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली. सचिन शिंदे याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसात काही गुन्हे दाखल आहेत. त्याला काही प्रकरणात अटक झाली होती. नुकताच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता.  पुणे ग्रामीण भागामध्ये गोळीबाराची सत्र सुरूच असून गेल्या एका महिन्यात हा तिसरा गोळीबार आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागामध्ये गावठी पिस्तुलाच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पुणे ग्रामीण पोलिस दालासमोर निर्माण झाले आहे. भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने लोणीकंद परिसरात गुंडांची दहशत पसरली आहे. 

दरम्याण, जानेवारीमध्ये शिरुर येथे भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला; तर एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे गोळीबाराच्या घटना वारंवार घडत असल्याने पुणे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसले आहे.  तो गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध होता. सोन्याचे भरपूर दागिने घातलेले त्याचे फोटो सोशल मिडियात आहेत. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास उभा असताना सचिन शिंदे याच्यावर मंगळवारी (9 फेब्रुवारी 2021) दुपारी गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्ती अॅक्टीव्हा गाडीवरुन आल्या. त्यापैकी पाठिमागे बसलेल्या व्यक्तीने सचिन शिंदे याच्यावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी सचिन शिंदे याच्या मानेजवळ लागली. तो जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे याला पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख