भरणेंच्या महत्वकांक्षी योजनेला ब्रेक; पाण्यासाठी तिसरी पिढी उतरणार आंदोलनात - A written order was finally issued to cancel the decision to supply water to Indapur from Ujani | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

भरणेंच्या महत्वकांक्षी योजनेला ब्रेक; पाण्यासाठी तिसरी पिढी उतरणार आंदोलनात

राजकुमार थोरात
गुरुवार, 27 मे 2021

या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

वालचंदनगर (जि. पुणे) : उजनी जलाशयातील पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी देण्याच्या योजनेचा 22 एप्रिलचा आदेश रद्द करण्यात आला आहे. त्याबाबतचा लेखी आदेश जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी काढला आहे. या आदेशामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या महत्वकांक्षी योजनेला ब्रेक लागला आहे. प्रतिष्ठा पणाला लावूनही ही योजना रद्द झाल्याने भरणे यांच्यासह इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तो धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली असून इंदापूरकरांना पुन्हा पाण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (A written order was finally issued to cancel the decision to supply water to Indapur from Ujani)

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे पुणे व पिंपरी चिंचवडमधून वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी 5 टीएमसी पाणी उजनी जलाशयाच्या बिगर सिंचन पाणी वापरातून उर्ध्वबाजूचे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून शेटफळगढे येथील खडकवासल्याच्या नवीन मुठा कालव्यात सोडण्याच्या योजनेला सरकारने तत्तव: मान्यता दिली होती. या योजनेचे सर्वेक्षण करण्याचा आदेश 22 एप्रिल रोजी देण्यात आला होता. 

हेही वाचा : बबनदादा शिंदे यांची आमदारकी वाचली : उजनीचा लेखी आदेश निघाला

राज्यमंत्री भरणे यांनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावत अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ही योजना तयार केली होती. या योजनेच्या माध्यमातून त्यांनी इंदापूरचा गेली ५० वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला सोलापुरातून तीव्र विरोध झाल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला होता. तेव्हाच भरणे यांना तो धक्का मानला जात होता. दुसरीकडे सोलापूरचे नेतेही हा आदेश रद्द करण्यासाठी हटून बसले हेाते. त्यामुळे अखेर ही योजना रद्द करून त्याबाबतचा लेखी आदेश आज काढला.

या योजनेला सोलापूर जिल्हातील शेतकरी व पुढाऱ्यांनी विरोध करुन इंदापूरचे पाणी रद्द करण्याची मागणी केली होती. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 22 एप्रिलचा आदेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज गुरुवारी (ता.27 मे) जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजनाथ चिल्ले यांनी 22 एप्रिल 2021 चे शासकीय पत्र रद्द करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारे 5 टीएमसी पाण्याची योजना बारगळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे. 

इंदापूर तालुक्याला दिलेल्या पाण्याचा फेरविचार व्हावा, यासाठी तालुक्यातही अनेक ठिकाणी रास्ता रोको, जागरण-गोंधळ, बोंबाबोंब आंदोलने झाली होती. मात्र, अखेर सरकारने 22 एप्रिलचा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पाण्यासाठी गेली 50 वर्षांपासून आंदोलने
 
(स्व.) सूर्यकांत रणवरे, (स्व.) विश्‍वासराव रणसिंग यांच्यासह इंदापूर तालुक्याच्या 22 गावांतील शेतकरी शेतीच्या पाण्यासाठी गेल्या 50 वर्षापासून आंदोलने करीत आहेत. मात्र, त्याला यश आले नव्हते. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनाचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न केला. उजनी जलाशयातून 5 टीएमसी पाणी उचलण्याच्या योजनेचे सर्वेक्षण सुरु करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, सोलापूरकरांच्या विरोधामुळे योजना बारगळली असून 22 गावांतील पाण्याच्या प्रश्‍नही कायम राहिला आहे. पाण्याच्या प्रश्‍नासाठी दुसऱ्या पिढीबरोबर आता तिसरी पिढीही आंदोलन करणार आहे, असे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, निमसाखरचे सरपंच धैर्यशिल रणवरे, माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख