बाबूराव पाचर्णेंसाठी आम्ही आमची महत्वकांक्षा दूर ठेवणार; कंदांनीही भूमिका जाहीर करावी  - We will keep our ambitions for Baburao Pacharne's MLA post; Kand should also announce his role : Sanjay Pachange | Politics Marathi News - Sarkarnama

बाबूराव पाचर्णेंसाठी आम्ही आमची महत्वकांक्षा दूर ठेवणार; कंदांनीही भूमिका जाहीर करावी 

भरत पचंगे 
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

त्याची सुरुवात शिरुर नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला जागा दाखवून देत करणार असल्याचे स्पष्ट केले. 

शिक्रापूर (जि. पुणे) : विधानसभेच्या सहा निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात लढून दोन वेळा विधानसभेत पोचलेले आमचे नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सातव्यांदा निवडणूक लढवून आमदार व्हावे, हेच माझ्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे. आगामी निवडणुकीत आम्हाला (शिरूर भाजपला) 41 हजार मताधिक्‍याचा वचपा काढायचा आहे. त्यामुळे मी व आमच्या पक्षातील इतर इच्छुक आपल्या महत्वकांक्षा पाचर्णेंसाठी दूर ठेवणार आहोत, असे क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी जाहीर केले. 

दरम्यान, शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला जागा दाखवून देणारच आहोत. मात्र, तत्पूर्वी प्रदीप कंद यांनी त्यांची पक्षीय भूमिका जाहीर करावी, असे आव्हान पाचंगे यांनी कंद यांना दिले आहे. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कंद यांनी मात्र याबाबत मौन बाळगल्याने भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कंद हे माजी आमदार विलास लांडे यांच्याशी बोलून सांगतो म्हटल्याने तर या गोंधळात आणखी भर पडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पाचर्णे यांनी सातव्यांदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने कंद अस्वस्थ असल्याचेही बोलले गेले. 

आगामी विधानसभेसाठी पाचर्णेंबरोबरच भाजपतील आणखी काही जण इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रमुख इच्छुकांमधील भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सर्व इच्छुकांच्या वतीने आपली भूमिका जाहीर करीत आगामी निवडणुकीत आम्ही पाचर्णे यांच्या पाठीशी राहून आपल्या इच्छा दूर ठेवत असल्याचे जाहीर केले. या शिवाय पाचर्णेंचा 41 हजार मतांनी झालेला पराभवही जिव्हारी लागल्याचे सांगत पुढील निवडणुकीत त्याचाही वचपा काढण्याचा इरादाही बोलून दाखवला. त्याची सुरुवात शिरुर नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला जागा दाखवून देत करणार असल्याचे स्पष्ट केले. 

शिरुर-हवेलीची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली असून आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शिरूर-हवेलीच्या जागेसाठी शब्द दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिरूर भाजप 2019 च्या विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढायला तयार असताना कंद यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. 

आगामी शिरुर नगरपालिका, घोडगंगा कारखाना, जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकारातील सर्व निवडणुकांचा कार्यक्रम पाहता कंद यांची भूमिका तत्काळ जाहीर होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या शिरुर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वडगाव रासाईसह इतर प्रमुख ग्रामपंचायतींमधील निकाल हे भाजपच्या बाजूने लागलेले असल्याने कंद यांची भूमिका तत्काळ समजावी, त्यासाठी त्यांनी ती जाहीर करावी, असेही आवाहन पाचंगे यांनी कंदांना केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख