सोलापूरचे पाणी कमी होणार नाही; पण इंदापूरला पाणी मिळालंच पाहिजे : भरणे - The water of Solapur will not be depleted; But Indapur should get water : bharane | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूरचे पाणी कमी होणार नाही; पण इंदापूरला पाणी मिळालंच पाहिजे : भरणे

सागर आव्हाड
सोमवार, 10 मे 2021

या वेळी म्हणणे मांडताना दोन्ही बाजूचे लोक मंत्र्यांसमोरच तावातावणे बोलत एकमेकांना भिडले. 

पुणे : सोलापूरचे (Solapur) पाणी कमी होणार नाही. पण, इंदापूरला (Indapur) पाणी मिळालंच पाहिजे. सोलापूरची पाण्याची योजना दहा वर्षांपासून अपूर्ण आहे. ती पूर्ण मी करणार आहे. येत्या दहा महिन्यांत सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिले. (The water of Solapur will not be depleted; But Indapur should get water : bharane)

उजनी धरणातून (Ujani dam) पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्यावरून सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. या प्रश्नी सोमवारी (ता. १० मे) पुण्यातील सिंचन भवनात सोलापूर आणि इंदापूरच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात भरणे यांनी वरील आश्वासन दिले. या वेळी म्हणणे मांडताना दोन्ही बाजूचे लोक मंत्र्यांसमोरच तावातावणे बोलत एकमेकांना भिडले. 

हेही वाचा : लॉकडाउनने हिरावली रोजीरोटी अन्‌ त्याने पत्नी, मुलाचा खून करून केली आत्महत्या

राज्यमंत्री भरणे म्हणाले की, उजनी धरणाचे पाणी इंदापूरला नेण्यास सोलापूरचा विरोध होता, त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूर आणि इंदापूरचे प्रतिनिधी  या वेळी उपस्थित होते. सोलापुरातील शेतकऱ्यांच्या शंकेची उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली. उजनीचे पाणी इंदापूरला जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. पण, सगळ्याचं या उत्तराने समाधान झालेच, असं नाही. उजनी, खडकवासला धरणाचे पाणी आणि सांडपाणी याबाबत सोलापूरच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे. 

‘‘सोलापूरचे पाणी कमी होणार नाही. पण, इंदापूरला पाणी मिळालं पाहिजे, ही आमची भावना आहे. सोलापूरची पाण्याची योजना दहा वर्षे झाली, ती पूर्ण मी करणार आहे. येत्या दहा महिन्यांत सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न नक्की सोडवू. सोलापूरच्या प्रतिनिधींच्या शंकेचे निरसन अजूनही झालेलं नाही.अधिकाऱ्यांनी कागदपत्रे देऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. उजनीच्या पाणीप्रश्न निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजून एक दोन बैठका घेऊन हा प्रश्न सोडवू, असा विश्वास पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केला.

उजनी धरणातून कर्नाटक राज्यात जाणारं पाणी अडवलं पाहिजे. कृपा करून पाण्याच्या प्रश्नात राजकारण करू नये. सोलापूरच्या योजना सुरू झाल्या पाहिजेत आणि इंदापूरला पाणी मिळालं पाहिजे. पुणे शहरालादेखील खडकवासला प्रकल्पातील २२ टक्के पाणी लागतंय. त्यात इंदापूर ‘टेल’ (शेवटी) असल्याने इंदापूरला मिळणारे पाणी कमी झाले आहे, असेही भरणे यांनी सांगितले.

त्यात राजकारणच जास्त वाटत आहे : गारटकर

इंदापूरचे प्रतिनिधी म्हणून बोलताना प्रदीप गारटकर म्हणाले की, उजनी धरणातून पाणी उचलून खडकवासला कालव्यात आणलं जाणार आहे. ही योजना जुनीच आहे. अजित पवारांबाबत ते उल्लेख करताय, ते चुकीचे आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. सोलापूरचे पाणी पळवलं जातंय, असा गैरसमज निर्माण केला जात आहे. मात्र, ते वास्तव नाही. 

काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, तर त्यात राजकारणच जास्त वाटत आहे. उशाशी आलेलं पाणी आम्ही वापरणार आहे. ते सोलापूरचं पाणी नाही. पुण्याला पाणी जादा  उचललं जात आहे, त्यामुळे इंदापूरचं पाणी कमी झालं आहे. पुण्यातील तेच सांडपाणी आम्ही मागतोय आणि ते सरकार द्यायला तयार आहे, असे गारटकर यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख