पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान; आता उत्सुकता उमेदवारांची 

भगिरथ भालके त्यातून कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Voting for Pandharpur by-election on April 17; So the counting of votes on May 2
Voting for Pandharpur by-election on April 17; So the counting of votes on May 2

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघाची बहुचर्चित पोटनिवडणूक मंगळवारी (ता. 16 मार्च) जाहीर झाली. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबतची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षाच्या उमेदवार निवडींना वेग येणार आहे. 

आमदार भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीच्या तारखेविषयी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍यात उत्सुकता होती. ती निवडणूक आयोगाच्या आजच्या घोषणेने दूर झाली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार ता. 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ता 30 मार्च हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 31 मार्च रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 3 एप्रिल असणार आहे. मतदारसंघात 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

दोन्ही कॉंग्रेसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला होता. येथून भारत भालके हे मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाले होते. मात्र, त्यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागली आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. भारत भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांना राष्ट्रवादीने तिकीट द्यावे, अशी मागणी समर्थकांसह कॉंग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांनीही केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनीही पक्षश्रेष्ठीला त्याबाबत निर्णय घेण्याची विनंती करू, असे एका कार्यक्रमात म्हटले आहे. त्यामुळे उमेदवारी देताना राष्ट्रवादीला भगिरथ भालके यांच्या नावाचा विचार करावा लागणार आहे. 

असे असले तरी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून विठ्ठल परिवारात वादंग उठले आहे. त्यामुळे भगिरथ भालके त्यातून कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

एकीकडे भगिरथ भालके यांच्या उमेदवारीचा आग्रह होत असताना दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी गुगली टाकत भारतीय जनता पक्षाचे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. तसेच, मतदारसंघात सर्वे करून उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले होते. याचदरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांचाही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुण्यात त्यांची एक बैठक झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोलापुरातील कार्यक्रमाला आमदार परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक यांनी उपस्थिती लावली होती. तसेच, परिचारक यांच्यासाठी त्यांचे मित्र आमदार संजय शिंदे हे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. 

पोटनिवडणुकीबाबत परिचारक गटाने अद्याप आपले पत्ते खुले केले नाहीत. आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणय परिचारक यांनी पांडुरंग परिवाराची बैठक घेत नेत्यांनी सांगितल्यास निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु त्यावर प्रशांत परिचारक यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

याच मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्‍यातील संत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हेही निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. गेल्या वेळी ते भारत भालके यांच्या विरोधात अपक्ष लढले होते. त्या वेळी त्यांना 54 हजार मते पडली होती. त्यांनीही आपल्या संपर्कात भाजप आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असल्याचे सांगितले होते. त्याबाबत त्यांच्याशी बोलणीही झाल्याचे म्हटले आहे. 

शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शैला गोडसे यांनीही भालके कुटुंबाच्या बाहेरील उमेदवार असल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, धनगर समाजानेही पोटनिवडणूक लाढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com