राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

कोविड साथीच्या आजाराबाबत सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचे या विवाह सोहळ्यात पालन करण्यात आले नाही.
Violation of social distance rule in marriage of NCP Activist
Violation of social distance rule in marriage of NCP Activist

पुणे : जुन्नर तालुक्‍यातील बेल्हे गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या लग्न सोहळ्यात शनिवारी (ता. 27 फेब्रुवारी) सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोविड साथ रोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी करण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यासह पक्षाचे तालुक्‍यातील नेते उपस्थित होते. 

दरम्यान, आळेफाटा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल आप्पाराव शिंदे यांच्या फिर्यादीनुसार राज दरबार मंगल कार्यालयाचे मालक सुनील रामदास बडे, मुलाचे वडील रामदास मारुती वाघ आणि मुलीचे वडिल जयराम कोतू भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गोरक्ष ऊर्फ गोट्याभाऊ वाघ यांचे शनिवारी (ता. 27 फेब्रुवारी) बेल्हे हद्दीतील राज दरबार मंगल कार्यालयात लग्न होते. या लग्नात रात्री उशिरापर्यंत डीजे, लाईट सिस्टीम सुरू ठेवण्यात आले होते. या संबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. 

कोविडच्या साथीमुळे लग्न समारंभास 200 लोकांची मर्यादा असतानाही येथील लग्नात 500 ते 600 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. या सोहळ्यात कुणीही मास्क घातलेला नव्हता किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन कोणीही करताना दिसत नव्हते. शनिवारी (ता. 27 फेब्रुवारी) उशिरा वरील तिघांवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कोविड साथीच्या आजाराबाबत सरकारने घालून दिलेल्या नियम व अटींचे या विवाह सोहळ्यात पालन करण्यात आले नाही, तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून मास्क व सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन केले नाही. या कृत्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा संभव आहे, हे माहित असूनही याबाबतचे कृत्य हायगयीने केले. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार तपास करीत आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच नेतेमंडळी कोविडची वाढती रुग्णसंख्या पाहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून साथरोग नियमांचे वारंवार उल्लंघन होत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com