विमानतळाची जागा बदलून बारामतीचा विकास साधण्याचा डाव : शिवतारे 

केवळ मेहेरबानी म्हणून परस्पर विमानतळाची जागा बदलास आपला विरोध आहे.
Vijay Shivtare criticizes the decision to relocate the airport in Purandar
Vijay Shivtare criticizes the decision to relocate the airport in Purandar

सासवड (जि. पुणे) : "पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणे, हे मोठे षडयंत्र आहे. विमानतळाची आधीची पारगाव व सात गावांची जागा बदलून नव्याने रिसे, पिसे, पांडेश्वर आदी गावांतील म्हणजेच पुरंदर तालुक्‍याची जागा घ्यायची आणि विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करून तिकडचा विकास साधायचा. मग, विमानतळाच्या मागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी होणार आणि सर्वांगिण विकासाची संधी जाणार. त्यामुळे हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडण्यास सिद्ध आहोत,'' असा इशारा पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला. 


शिवसेनेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना भेटण्यासाठी शिवतारे हे आज मुंबईहून सासवड (ता. पुरंदर) येथे आले होते. सदस्यांना भेटल्यानंतर सायंकाळी त्यांनी कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"पुरंदरला विमानतळ आणताना मी सर्वपक्षीय बैठक घेऊन सकारात्मकपणे सांगितले होते. आता जागा बदलण्याचे कारण व विमानतळ रचना कशी होणार, याचे या बदल करणारांनी बैठक घेऊन सांगावे. पारगावचा विरोध अधिक आहे, तर ते गाव वगळून काही मार्ग काढता येऊ शकतो. पण, केवळ मेहेरबानी म्हणून भलत्याच तालुक्‍याचे भले करण्यासाठी परस्पर विमानतळाची जागा बदलास आपला विरोध आहे. नव्याने सूचविलेल्या जागेत विमानतळ पुण्यापासून पुन्हा 15 किलोमीटर लांब जाताना पुरंदरची जागा फक्त वापरली जाणार आहे. विकास मात्र बारामतीचा पाहिला जाणार आहे,'' असा आरोपही शिवतारे यांनी केला. 

शिवतारे म्हणाले, "विमानतळ जागा बदलून पुरंदरचे भले होणार नाही. याची मुंबई व लोहगाव विमानतळ ही जिवंत उदाहरणे आहेत. पुणे, पुरंदर, हवेलीपासून विमानतळ दूर सरकविण्याने या भागाचा विकास ठप्प होईल. बारामतीच्या सुपे भागात काही नेत्यांनी जमिनीची खरेदी केली. त्यामुळे जागा वापरून पुरंदरच्या वाट्याला विमानतळाची एकसलग कुंपणभिंत, रेडझोन आणि झोपडपट्टी आणण्याचे आणि प्रवेशद्वार बारामतीच्या दिशेला करण्याचे हे षडयंत्र आहे.'' 


ठाकरे-पवारांना भेटणार 

पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणे, हे मोठे षडयंत्र आहे. त्याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लवकरच लेखी मागणीसह भेटून पुरंदरच्या जनहितार्थ भावना मांडणार आहे. पुरंदरच्या वाट्याला आलेली विकासाची संधी हिरावून घेऊ नये, अशी विनंती करणार आहे, असेही माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com