माधव काळभोरांनी करून दाखविले : लोणीच्या सरपंच, उपसरपंचांची बिनविरोध निवड  - Unopposed election of Rajaram Kalbhor as Sarpanch of Loni Kalbhor | Politics Marathi News - Sarkarnama

माधव काळभोरांनी करून दाखविले : लोणीच्या सरपंच, उपसरपंचांची बिनविरोध निवड 

जनार्दन दांडगे 
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

या वेळी माधव काळभोर यांनी प्रशांत काळभोर यांना धडा शिकवत त्यांच्याकडून ग्रामपंचायत हिसकावून घेत एकेकाळच्या आपल्याच सहकाऱ्याला धोबीपछाड दिली.

उरुळी कांचन (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजाराम विठ्ठल काळभोर यांची, तर उपसरपंचपदी ज्योती अमित काळभोर यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलला बहुमत मिळाल्याने सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. 

दरम्यान, माधव काळभोर आणि विरोधी पॅनेलचे प्रशांत काळभोर गेल्या वेळी एकत्र होते. मात्र, काही कारणामुळे त्यांच्यात वितुष्ट आले. या वेळी माधव काळभोर यांनी प्रशांत काळभोर यांना धडा शिकवत त्यांच्याकडून ग्रामपंचायत हिसकावून घेत एकेकाळच्या आपल्याच सहकाऱ्याला धोबीपछाड दिली. अपेक्षेप्रमाणे सरपंच आणि उपसरपंचही बिनविरोध करत माधव काळभोर यांनी ग्रामपंचायतीचा सत्ता मिळवून करून दाखविले. 

माधव काळभोर व विलास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सतरापैकी तेरा जागा जिंकुन ग्रामपंचायतीवर एकहाती झेंडा फडकावला होता. प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेलला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले होते. विरोधी गटाला केवळ चार जागा मिळाल्याने सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध होण्याची चर्चा होती, ती खरी ठरली. 

निवडणूक निर्णय अधिकारी तथा हवेलीचे कृषी अधिकारी अमित ननवरे यांच्या उपस्थितीत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सभागृहात मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास सरपंच व उपसरपंच निवडीस सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंच व उपसरपंचपदासाठी अनुक्रमे राजारामबापू काळभोर व ज्योती काळभोर या दोघांचेच अर्ज आले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी सरपंचपदी राजाराम काळभोर यांची, तर उपसरपंचपदी ज्योती काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष केला, तर माधव काळभोर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच राजाराम काळभोर व ज्योती काळभोर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे सुभाष काशिनाथ काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, उद्योजक मनीष काळभोर यांच्यासह विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, हवेलीचे माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोर सोसायटीचे माजी अध्यक्ष सूर्यकांत काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, योगेश काळभोर व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय पवार आदी उपस्थित होते. 

सरपंच निवडीच्या वेळी परीवर्तन पॅनेलचे योगेश प्रल्हाद काळभोर, भारत दत्तात्रेय काळभोर, नागेश अंकुश काळभोर, सविता गिताराम लांडगे, प्रियांका सचिन काळभोर, ललिता राजाराम काळभोर, माधुरी राजेंद्र काळभोर, गणेश तात्याराम कांबळे व भारती राजाराम काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके व संगीता सखाराम काळभोर हे अकरा सदस्य हजर होते. 

भयमुक्त कारभार करणार : राजाराम काळभोर 

निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच राजाराम काळभोर म्हणाले, "लोणी काळभोरच्या विकासासाठी सरपंचपदाचा उपयोग करणार आहे. गावच्या हद्दीत मोठमोठे बांधकाम व्यावसायिक व विविध व्यवसाय यावेत, यासाठी रस्ते व पुरेसे पाणी या पायाभूत सुविधा देण्याबरोबरच, ग्रामपंचायतीचा कारभार भयमुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. विविध व्यवसाय आल्यास रोजगार वाढणार आहे. आमदार अशोक पवार व माधव काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम सरपंचपदाच्या माध्यमातून केले जाणार आहे.'' 

महिलांसाठी विशेष काम करणार : ज्योती काळभोर 

उफसरपंच ज्योती काळभोर म्हणाल्या, "उपसरपंच पदाच्या माध्यमातून लोणी काळभोरचा सर्वांगीण विकास करतानाच ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहे. ज्येष्ठ नेते माधव काळभोर व विलास काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते, पिण्याचे पुरेसे व शुद्ध पाणी वाडीवस्त्यावर पोचविण्यासाठी काम करणार आहे. महिलांना ग्रामपंचायतीचा दरवाजा कायम उघडा व भयमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख