....अन्‌ इंदापूर तालुक्यात हिरो, तर सोलापूर जिल्ह्यात खलनायक ठरलो   - Ujani decided on water and became a hero in Indapur and a villain in Solapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

....अन्‌ इंदापूर तालुक्यात हिरो, तर सोलापूर जिल्ह्यात खलनायक ठरलो  

डॉ. संदेश शहा 
गुरुवार, 29 एप्रिल 2021

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचे आपणास संपूर्ण भान आहे.

इंदापूर (जि. पुणे) : राज्य मंत्रिमंडळात मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग राज्यातील जनता, तर आमदारकीचा उपयोग इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी करत आहे. त्याचाच भाग म्हणून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पुणे व पिंपरी चिंचवड येथून वाहून येणाऱ्या सांडपाण्यातून प्रकिया केलेले पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी मिळावे, यासाठी प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळाने या योजनेचा सर्व्हे करण्यास तत्त्वता मान्यता दिल्याने सर्व्हे प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आपण इंदापूर तालुक्यात हिरो, तर सोलापूर जिल्ह्यात खलनायक ठरलो आहे, अशी कबुली राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. 

इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालय कॉनफरन्स हॉलमध्ये पत्रकारांशी राज्यमंत्री भरणे बोलत होते.

ते म्हणाले, मी ज्यावेळी प्रथम आमदार झालो, त्यावेळी सत्तेत भाजप शिवसेना होती. त्यावेळी तालुक्याचे नीरा डाव्या कालव्याचे ४ टीएमसी पाणी फलटणकडे निरा उजव्या कालव्यातून वळविण्यात आले होते. त्यातच खडकवासला धरणातील पाणी सत्ताधारी भाजपने पुणे शहरासाठी वापरले. त्यातच कालव्याचे दुष्काळामुळे व्यवस्थित आवर्तन न आल्याने नागरिक नाराज होते. त्यामुळे नंतर झालेल्या निवडणुकीत १० हजार मते कमी पडली.त्याचे शल्य मनात होते. त्यामुळे येथन पुढे फक्त पाण्यासाठी काम करायचे ठरवून पाण्याचे नियोजन केले.

राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी अनेकवेळा चर्चा केली. त्यानंतर ता. १२ जून २०१९ रोजी नीरा उजव्या कालव्यात जाणारे पाणी पूर्वीप्रमाणे नीरा डाव्या कालव्यात यावे म्हणून यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे १९ फेब्रुवारी २०२० रोजी सरकारने पुन्हा ४ टीएमसी पाणी नीरा डाव्या कालव्यातून इंदापूरला दिल्याने तालुक्यात शेतीस पाणी उपलब्ध झाले. 

त्यानंतर इंदापूर तालुक्याचे १२ प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडले. नीरा डावा, खडकवासला कालवा अस्तरीकरण व वहन क्षमता वाढविणे, लाकडी निंबोडी पाणी पुरवठा, म्हसोबाची वाडी, शेटफळगढे ते लामजेवाडी, मदनवाडी ते गलांडवाडी नंबर २, तालुक्यातील निमगाव केतकी ते निमसाखर परिसरातील २२ गावे बारमाही करणे तसेच तालुक्यास पुन्हा पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये; म्हणून प्रयत्न सुरू केले.

पुणे व पिंपरी चिंचवडचे सुमारे २२ टीएमसी सांडपाणी मुठा नदीतून भीमा नदीत येते. त्याचा अभ्यास करून जलसंपदा कमिटी व सरकारल ता. ६ नोव्हेंबर २०२० रोजी पत्र दिले. त्याचा अहवाल सरकारकडे गेल्यानंतर २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी त्यास तत्त्वता मान्यता दिल्याने त्याचा तातडीने सर्व्हे सुरू झाला. त्याचा फायदा तालुक्यास भविष्यात निश्चित होणार आहे, असा दावा भरणे यांनी केला. 

उन्हाळ्यात उजनीचे पाणी खाली गेल्यानंतर शेतकऱ्यांची गैरसोय हेाते, त्यामुळे कुंभारगाव, कालठण नंबर एक, डाळज, शिरसोडी, निरा नदीवर खोरोची येथे बंधारे करण्याचे तसेच शेटफळ हवेली तलावाची उंची वाढविण्याचे नियोजन आहे. प्रत्येक घरात नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २०२३ पर्यंत पावणे तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या सर्व प्रकियेत सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचा एक थेंबही वापरला जाणार नाही. मात्र, विरोधक याचे राजकीय भांडवल करत आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचे आपणास संपूर्ण भान आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासास कटिबद्ध आहे. ‘माल है तो ताल है, नही तो सब कंगाल है’ हे आपणास माहिती आहे. इंदापुरात हिरो झाल्यामुळे विरोधक पाणी प्रश्नावरून आपणास खलनायक ठरवत आहेत. मात्र, आपण खराखुरा नायक असल्याचे भरणे हे सांगण्यास विसरले नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख