बाहेरच्या मतदारावरून लोणीत दोन्ही गट पुन्हा भिडले : वाहनांची तोडफोड; वेळेनंतरही मतदान 

कोण निवडुन येणार व कोण पडणार, याची उत्सुकता जनतेला लागून राहिली आहे.
The two groups clashed over an outside voter in Loni Kalabhor; Vehicle vandalism
The two groups clashed over an outside voter in Loni Kalabhor; Vehicle vandalism

उरुळी कांचन (जि. पुणे) : लोणी काळभोर, उरुळी कांचन, सोरतापवाडीसह पूर्व हवेलीमधील अकरा ग्रामपंचायतीपैकी लोणी काळभोर ग्रामपंचायत वगळता उर्वरीत गावांत शुक्रवारी (ता. 15 जानेवारी) शांततेत मतदान पार पडले.

लोणी काळभोरमध्ये मात्र हद्दीबाहेरील मतदारावरुन दोन गटात सकाळी अकराच्या सुमारास बाचाबाची झाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या लोकांना दूर केले, तरी दिवसभर हद्दीबाहेरील मतदारांना मतदान करण्यावरून दोन्ही गटांत तणावाचे वातावरण होते. 

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, सोरतापवाडी, उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, भवरापूर व तरडे या अकरा ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. येत्या सोमवारी (ता. 18 जानेवारी) मतमोजणी होणार आहे. 


लोणी काळभोरसह पूर्व हवेलीतील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारांनी पारंपारिक प्रचाराला आधुनिकतेची जोड दिल्याने प्रचाराची रंगत वाढली होती. सर्वच पॅनेल प्रमुख व अपक्ष उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे मोठ्या प्रमाणांत पैशाचा वापर करून मतदारांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मताचे दान आपल्यालाच मिळावे, यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते धावपळ करत होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला, त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे आढळून आले. अपंग व वृद्ध मतदारांनाही आणण्यासाठी चढाओढ लागली होती. 

सायंकाळी साडेपाचनंतरही मतदारांना आणण्याचा सपाटा चालूच होता. मतदान संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपणच बहुमताने निवडून येणार असल्याचा दावा केला. लोणी काळभोर वगळता उर्वरित ग्रामपंचायत हद्दीत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी आपल्या कर्मचाऱ्याचा योग्य बंदोबस्त लावल्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. 

लोणीत दिवसभर तणावाचे वातावरण 

लोणी काळभोरमध्ये प्रचारादरम्यान तीन दिवसांपूर्वी दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटातील बावीस जनांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, मतमोजणी होईपर्यंत या बावीस जणांना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे आजची निवडणूक सुरळीत पार पडेल असे वाटत असतानाच मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच दोन्ही गटांत पुन्हा बाचाबाची सुरु झाली.

हद्दीबाहेरील मतदारांना मतदान करण्यास मज्जाव केल्याने एका गटाने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यापर्यंत पोचले. पण, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर व सहकाऱ्यांनी हस्तक्षेप करुन, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना दूर केले. त्यानंतर दिवसभर तणाव कायम होता. 

या पार्श्‍वभूमिवर जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिवसभरात दोन वेळा लोणी काळभोर येथे भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर या दोन गटांत तणावाचे वातावरण होते. पण, पोलिसांनी तारेवरची कसरत करत परिस्थिती हाताळली. 

उरुळी कांचन पॅटर्न 

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पॅनेल पद्धतीने निवडणूक होत असली तरी, उरुळी कांचन मात्र त्यास अपवाद ठरले आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी स्वतंत्र आघाड्या अथवा युती करून निवडणूक लढवली आहे. मागच्या निवडणुकीतील एकमेकांचे प्रतिस्पर्धी या वेळी एकत्र येऊन निवडणूक लढवत होते. उरुळी कांचनमध्ये एक महिला बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरीत 16 जागांसाठी 55 जण नशीब आजमावत होते.

निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रत्येक उमेदवारांने साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या प्रकाराने मतदारांशी संपर्क साधून मतदानात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र मतदानाची टक्केवारी बघता या मतदारांनी उमेदवारांना आपल्यापासुन थोडे दूर ठेवल्याची चर्चा होती. यामुळे कोण निवडुन येणार व कोण पडणार, याची उत्सुकता जनतेला लागून राहिली आहे. 


पूर्व हवेलीतील ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान टक्केवारीत 

लोणी काळभोर : 67 टक्के, थेऊर : 80 टक्के, कुंजीरवाडी : 86 टक्के, आळंदी म्हातोबाची : 82 टक्के, सोरतापवाडी : 75 टक्के, उरूळी कांचन : 66 टक्के, कोरेगाव मूळ : 81 टक्के, शिंदवणे : 87 टक्के, वळती : 85 टक्के, भवरापूर : 90 टक्के, तरडे : 81 टक्के. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com