सोलापूरकरांनी आमची खोडी काढलीय, त्यांना ती लयं महागात पडणार आहे 

येत्या तीस तारखेपर्यत वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचे व त्या नंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
Timely bloodshed for Ujani dam water : shrimant Dhole
Timely bloodshed for Ujani dam water : shrimant Dhole

निमगाव केतकी (जि. पुणे)  ः उजनी धरणाकरिता (Ujani dam) इंदापूर (Indapur) तालुक्यातील शेकडो कुटुंबांनी त्याग केलेला आहे. तीन पिढ्यांनंतर आज हातातोंडांशी आलेला घास जर कोण हिरावून घेत असेल, तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. उजनीतून मंजुर झालेले हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळविण्यासाठी आम्ही लढायला सज्ज आहोत. वेळ पडल्यास रक्तही सांडू, असा इशारा इंदापुर तालुका शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिला. (Timely bloodshed for Ujani dam water : shrimant Dhole)

दरम्यान, निषेध सभा संपताच संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालूका अध्यक्ष सागर मिसाळ यांनी अंगावर राॕकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो कार्यकर्त्यांनी रोखून धरला. या वेळी आमच्या हक्काच पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर आंदोलकांनी इंदापूर बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

पुण्याच्या सांडपाण्यातून इंदापूरला उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी सोलापूरच्या लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांसमोर करताच त्याचे इंदापुरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. 

या निर्णयाच्या विरोधात आज निमगाव केतकी येथील संत सावता माळी मंदीराच्या प्रागंणात सर्वपक्षीय जाहीर निषेध सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत ढोले हे होते. उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय घेऊन एक महिना होत नाही, तोपर्यंत हा निर्णय रद्द केल्याने सभेत कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत तीव्र संघर्ष उभा करण्याचा निर्णय घेतला.

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले, पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे त्यांना नऊ टीएमसी वरुन सध्या बावीस टीएमसी पाणी लागत आहे. यात इंदापूरच्या हक्काचे पाणी कमी झाले. पुण्याचे सांडपाणी मिळावे, अशी आमची मागणी होती. राज्यमंत्री दतात्रेय भरणे यांच्या प्रयत्नांतून पाच टीएमसी पाण्याला मंजूर मिळाली असताना काल सोलापुरातील लोकप्रतिनिधी व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी दबाव आणताच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केला. त्यांचा हा निर्णय अतिशय निराशाजनक आहे. त्यांनी हा निर्णय माघारी घेऊन आम्हाला आमच्या हक्काच पाणी द्यावे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढलीय, आता त्यांना ती लय महागात पडणार आहे. येत्या १५ आॕक्टोबरनंतर ते मोठ्या प्रमाणात वापरत असलेले बोगस पाणी आम्हीपण बंद करू, असा इशारा त्यांनी दिला.

 या वेळी पाणी अभ्यासक बाळासाहेब करगळ, शेतकरी कृती समितीचे उपाध्यक्ष गणेश झगडे,  बाजार समितीचे माजी सभापती हनुमंत वाबळे, माजी सभापती दत्ताञेय शेंडे, डाॕ.शशीकांत तरंगे,अॕड लक्ष्मणराव शिंगाडे, अभिजीत रणवरे, सचिन सपकळ, युवा नेते किरण बोरा, सागर मिसाळ, निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण डोंगरे, माजी उपरपंच तात्यासाहेब वडापुरे, सतोष राजगुरु, भजनदास पवार, बाबासाहेब भोंग यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची भाषणे झाली. 

अतुल झगडे यांनी सूत्रसंचालन केले. अचानक घेतलेल्या या निषेध सभेस मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. येत्या तीस तारखेपर्यत वरिष्ठ नेत्यांना भेटण्याचे व त्या नंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com