दिव्यांगांच्या सुखी संसारासाठी सुप्रिया सुळे घेणार पुढाकार  - Supriya Sule will take the initiative for a happy life for the disabled | Politics Marathi News - Sarkarnama

दिव्यांगांच्या सुखी संसारासाठी सुप्रिया सुळे घेणार पुढाकार 

मिलिंद संगई 
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

दिव्यांगासाठी जीवनाचा जोडीदार निवडणे व लग्न करणे या बाबी अवघड ठरतात. यासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

बारामती : दिव्यांगासाठी जीवनाचा जोडीदार निवडणे व लग्न करणे या बाबी अवघड ठरतात. यासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती खासदार सुळे यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून (ता. 13 डिसेंबर 2020) रोजी दिव्यांगासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसामुळे किमान 80 विवाह या सोहळ्यात व्हावेत अशी इच्छा सुळे यांनी व्यक्त केली. एप्रिल महिन्यात हा विवाह सोहळा होणार, असून लवकरच या बाबत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. 

या विवाह सोहळ्यासाठी आजपर्यंत किमान 400 ऑनलाईन अर्ज आले आहेत, अशी माहिती विजय काणेकर यांनी दिली. 23 फेब्रुवारी रोजी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात या दिव्यांग वधू वरांचा प्रत्यक्ष परिचय मेळावा होणार आहे. परस्परांना पाहण्यासह समजून घेणे व त्यांच्या संकल्पना काय असतील हे वधू वर या परिचय मेळाव्यातून समजून घेणार आहेत. 

दिव्यांगाना साधारण जीवन जगता यावे व त्यांनाही आयुष्यभरासाठी जोडीदार मिळावा या उद्देशाने हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम सुप्रिया सुळे यांनी हाती घेतला आहे. या सोहळ्यात वधू वरांना कोणताच खर्च करावा लागणार नसल्याने त्यांच्या दृष्टीने हा सोहळा महत्वाचा ठरणार आहे. 

हे हि वाचा...

वाघा बॉर्डरपेक्षाही आंदोलनाच्या ठिकाणी वाईट परिस्थिती 
 
बारामती : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी काही सहकारी खासदारांसह शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते, मात्र वाघा सीमेवरही जी परिस्थिती नाही, त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आंदोलनाच्या ठिकाणी आहे. वाघा सीमेवर समोरचा माणूस दिसतो तरी, येथे आम्हाला शेतकरी दिसलेच नाहीत, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 

केंद्राच्या वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलींचे वाटप बारामतीत करण्यात आले. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 

यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दसपटीने अधिक फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जणू काही शेतकरी गोंधळ घालायलाच तेथे आले आहेत. ही सगळीच परिस्थिती दुर्देवी आहे, मी माझ्या आयुष्यात कधीच जगातल्या कुठल्याच सीमेवर अशी परिस्थिती पाहिली नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारव निशाणा साधला.  

इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाला कमालीचा त्रास होतो आहे. ही बाब विचारात घेत केंद्र सरकार या बाबत काहीतरी निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदारसंघ देशात आघाडीवर आहे, प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांचे सुळे यांनी कौतुक केले. पहिल्या टप्प्यात 150 तीन चाकी बॅटरीवर चालणा-या सायकलींचे वाटप केले. या योजनेत जे निकषानुसार पात्र ठरतात त्या प्रत्येकाला तीन चाकी सायकल वाटप केले, जाणार असल्याची ग्वाही सुळे यांनी दिली. एप्रिल महिन्यात या संदर्भातील मेगा कँप बारामतीत घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख