वाघा बॉर्डरपेक्षाही आंदोलनाच्या ठिकाणी वाईट परिस्थिती  - Supriya Sule criticized the central government over the farmers movement | Politics Marathi News - Sarkarnama

वाघा बॉर्डरपेक्षाही आंदोलनाच्या ठिकाणी वाईट परिस्थिती 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

वाघा सीमेवर समोरचा माणूस दिसतो तरी, येथे आम्हाला शेतकरी दिसलेच नाहीत, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 

बारामती : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मी काही सहकारी खासदारांसह शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते, मात्र वाघा सीमेवरही जी परिस्थिती नाही, त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आंदोलनाच्या ठिकाणी आहे. वाघा सीमेवर समोरचा माणूस दिसतो तरी, येथे आम्हाला शेतकरी दिसलेच नाहीत, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 

केंद्राच्या वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलींचे वाटप बारामतीत करण्यात आले. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 

यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दसपटीने अधिक फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जणू काही शेतकरी गोंधळ घालायलाच तेथे आले आहेत. ही सगळीच परिस्थिती दुर्देवी आहे, मी माझ्या आयुष्यात कधीच जगातल्या कुठल्याच सीमेवर अशी परिस्थिती पाहिली नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारव निशाणा साधला.  

इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाला कमालीचा त्रास होतो आहे. ही बाब विचारात घेत केंद्र सरकार या बाबत काहीतरी निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदारसंघ देशात आघाडीवर आहे, प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांचे सुळे यांनी कौतुक केले. पहिल्या टप्प्यात 150 तीन चाकी बॅटरीवर चालणा-या सायकलींचे वाटप केले. या योजनेत जे निकषानुसार पात्र ठरतात त्या प्रत्येकाला तीन चाकी सायकल वाटप केले, जाणार असल्याची ग्वाही सुळे यांनी दिली. एप्रिल महिन्यात या संदर्भातील मेगा कँप बारामतीत घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांना भेटण्यापासून खासदारांना रोखले होते...
 
राष्ट्रवादी काँग्रेससेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदार आज गाजीपूर सीमेवर, शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. मात्र, त्याना गाजीपूर सीमेवर अडवले. आंदोलनस्थळावर जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले. 

सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॅार्डवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. मात्र, या सर्वांना दिल्ली पोलिसांनी या सीमेवरच अडवण्यात आले. 

शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी देशातील विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार एकत्र आले होते. सर्व खासदारांनी मिळून आंदोलनस्थळी जाण्यासाठी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे सर्व खासदार आंदोलकांना न भेटताच परले होते. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी गाझीपूर सीमेला भेट दिल्यानंतर फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, गाझीपूर बॉर्डर, दिल्ली येथे गेली ७० दिवस आंदोलन करीत असलेल्या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. परंतु आम्हाला त्यांना भेटू दिले नाही. गाझीपूर बॉर्डरचे दृश्य पाहून आपण नक्की भारतातच राहतो का असा प्रश्न पडला, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.  

संपूर्ण रस्ता एखाद्या किल्ल्यासारखा चहूबाजूंनी बंदिस्त केला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अन्न, पाणी व इतर आवश्यक सुविधा मिळू द्यायच्या नाहीत असा जणू चंग केंद्र सरकारने बांधलाय. याबद्दल मी केंद्र सरकारचा जाहिर निषेध करते. आपल्या संस्कृतीत 'अन्नदाता सुखी भव' असा उल्लेख आहे. पण केंद्र सरकार अन्नदात्या शेतकऱ्यांना अशी अमानुष वागणूक देत आहे, हे निषेधार्ह, असल्याचे सुप्रीय सुळे म्हणाल्या.

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख