दत्तात्रेय भरणेंनी करून दाखवलं : इंदापूरसाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथेबरोबर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्याचीही शपथ घेतली होती.
State Government's permission to draw five TMC of water from Ujani Dam for Indapur
State Government's permission to draw five TMC of water from Ujani Dam for Indapur

वालचंदनगर (जि. पुणे)  ः उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी ५ टीएमसी पाणी उचलण्यासाठी परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे आजचा दिवस इंदापूरकरासांठी ऐतिहासीक ठरला आहे. उजनीच्या या पाच टीएमसी पाण्यामुळे तालुक्यातील २२ गावांसह एकूण ५८ गावांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. त्यातून तालुक्यातील सुमारे ६५ हजार एकर शेतीला उजनीचे पाणी मिळणार आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्वतः दिली.

इंदापूर तालुक्यामध्ये राज्यातील सर्वात मोठे धरण असूनही तालुक्याला उजनीचे पाणी मिळत नसल्याने धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती होती. गेल्या पन्नास वर्षांपासून तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न प्रलंबित होता. पाण्याच्या प्रश्‍नावर अनेक निवडणूका झाल्या व गाजल्याही. मात्र, उजनीतून  तालुक्यातील शेतीला पाणी देण्याचा प्रश्‍न प्रलंबित राहिला.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथेबरोबर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्याचीही शपथ घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून  भरणे यांनी शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केला होता. त्याला आज यश आले. 

लाकडी-निंबोडी उपसा पाणी योजनेचा विषय मार्गी लागल्यानंतर त्यांनी उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. आज गुरुवारी (ता.२२ एप्रिल) या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी झाली असून या योजनेला मूर्त स्वरूप आले आहे. गेल्या ५० वर्षांपासून  पाणी प्रश्‍नासाठी जनता आग्रही होती. 

या संदर्भात भरणे यांनी सांगितले की, कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एचपी क्षमतेच्या विद्युत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी सुमारे १० कि.मी. अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथन हे पाणी सणसर कटद्वारे नीरा डाव्या कालव्यावरील २२ गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे.

खडकवासला कालव्यातून इंदापूरपर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यावरून  सुमारे ६३ हजार एकर  क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपयेचा निधी खर्च अपेक्षीत असून या योजनेसाठी दोन वर्षांचा कलावधी जाणार आहे. 

राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील १४३ गावापैंकी ५८ गावातील हजारो शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. या योजनेचा सर्व्हे करण्याचा आदेश देण्यात आला असून चार महिन्यांमध्ये सर्व्हे पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर योजनेचा काम पूर्ण होणार अून जलसंपदा मंत्रालयाने याबाबत सरकारी निर्णय पारित केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

अजित पवार, सुप्रिया सुळेंची मदत

इंदापूर तालुक्यातील २२ गावांसह खडकवासला कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये कालव्याचे पाणी मिळत नव्हते. यामध्ये शेतकऱ्यांची पिके शेवटच्या टप्यामध्ये जळून जात होती. उजनीतून ५ टीएमसी पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून शेतीच्या सिंचनाचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची मोलाची मदत झाल्याचे भरणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com