राष्ट्रवादीचा राजू शेट्टींना दे धक्का : स्वाभिमानीच्या माजी जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Solapur Former District President of Swabhimani Shetkari Sanghatana Samadhan Fate joins NCP | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचा राजू शेट्टींना दे धक्का : स्वाभिमानीच्या माजी जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भारत नागणे
गुरुवार, 8 एप्रिल 2021

उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचे जाहीर करत त्यांचे स्वागत केले.

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. ८ एप्रिल) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचे जाहीर करत त्यांचे स्वागत केले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्रपणे उमेदवार दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही पंढरपूरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे दोन्ही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून आहेत. अशातच स्वाभिमानीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने स्वाभिमानीला पंढरपुरात मोठा धक्का बसला आहे.

गादेगाव येथे गुरुवारी (ता. ८ एप्रिल) दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे, नवनाथ माने, कीर्तीकुमार गायकवाड, अतुल कारंडे, चंद्रकांत बागल, अमोल पवार, अतुल फाटे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम केलं. परंतु शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न सुटला नाही. उलट चळवळीच्या नावाखाली अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधल्याचा आरोप माजी जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख