बैलगाडा शर्यतीबाबत आढळरावांची वळसे पाटलांना साद

बैलगाडामालक बंदी उठवण्यासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
 Shivajirao Adhalrao Patil, Dilip Walse Patil  .jpg
Shivajirao Adhalrao Patil, Dilip Walse Patil .jpg

पारगाव : बैलगाडा शर्यत बंदीच्या प्रश्नावर आपण दोघे एकत्र आल्यास शर्यत बंदी उठण्याच्या प्रक्रियेला नक्कीच गती मिळेल, असे आवाहन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदी असतानाही सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यत भरवून या प्रश्नावर भाजप आक्रमक झाल्याचे दाखवून दिले असताना एकमेकांचे विरोधक असूनही राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या आढळराव पाटलांनी शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वळसे पाटलांना केलेल्या आहवानाला महत्व प्राप्त झाले आहे. (Shivajirao Adhalrao Patil's warning to the government) 

सर्वोच्य न्यायालयाची बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने अनेक वर्षापासून शर्यती बंद आहेत. सुरवातीपासून या प्रश्नावर आढळराव पाटील यांनी आंदोलन तसेच न्यायालयीन लढाई लढली आहे. वळसे पाटील यांनीही कायदेशीर बाजू मांडली असून शासन स्तरावर बंदी उठण्यासाठी प्रयत्न केले आहे. मागील काही दिवसापासून बैलगाडा शौकीन व बैलगाडामालक बंदी उठवण्यासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील बैलगाडामालक मालकांनी मागील पंधरवड्यात लांडेवाडी येथील आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन बंदीबाबत आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आठवडाभरातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे बैठकीचे आयोजन केले होते. 

कोल्हे यांनी स्वता आढळराव पाटील यांना फोनकरून या विषयावर आपण सर्व राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊ, आपण बैठीकीला यावे या केलेल्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मिडिया वर व्हायरल केला होता. आढळराव यांनीही मी बैलगाडामालकांसोबत आहे. मात्र, मला पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठीकीला उपस्थित राहता येत नसल्याचे निवेदन सोशल मिडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर आठवड्यातच न्यायालयाची बंदी असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात प्रशासनाला चकवा देत गनिमीकाव्याने शर्यत भरवलयाने आमदार पडळकर राज्यातील बैलगाडा शौकीन व बैलगाडा मालकांमध्ये हिरो झाल्याचे चित्र निर्माण होऊ लागले. 

आमदार महेश लांडगे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील अगदी आंबेगाव तालुक्यातूनही अनेक बैलगाडा मालकांनी झरे गावाच्या परिसरात असलेली संचारबंदी भेदून आमदार पडळकर यांची भेट घेऊन अभिनंदन केले. त्यानंतर आढळराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पंधरा दिवसात सरकारने शर्यतीला परवानगी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याची घोषणा केल्याने शेतकर्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यातच आज मंचर (ता. आंबेगाव) येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व एकेकाळी एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले शिवाजीराव आढळराव पाटील एकत्र आले होते. 

यावेळी बोलताना खासदार आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यत बंदीच्या प्रश्नावर आपण दोघे एकत्र येऊ असे आवाहन वळसे पाटील यांना केले. त्यावर बोलताना वळसे पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले कि बैलगाडा शर्यत बंदीविरोधात राजकारण करण्याची कोणाचीही भूमिका नाही. राज्यातील सर्व राजकीय पक्ष व राज्य सरकारही शर्यत सुरु होण्याच्या बाजूने आहेत बैल हा प्राणी संरक्षक प्राण्याच्या यादीत गेल्याने अडचणीत वाढ झाली आहे सध्या हा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आहे. जोपर्यंत या प्रश्नावर ते निकाल देणार नाहीत, तोपर्यत शर्यतींवरील बंदी उठणार नाही त्यामुळे आपणाला न्यायलयीन लढा द्यावा लागणार आहे. आजपर्यत बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार म्हणून आगामी काळात कोणीही कायदा हातात घेऊन बैलगाडा शर्यती भरवू नये, अशी सूचनाही त्यांनी बोलताना केली. शेजारच्या खेड तालुक्यात राज्यात सत्तेत एकत्र असलेले शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सतत वादाच्या ठिणग्या पडत असताना आंबेगाव तालुक्यात दोन्ही पक्षाचे नेते एकत्र व्यासपिठावर येऊ लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com