शिवसेना सदस्यांनी अनिल देसाई आणि आढळराव यांचेही ऐकले नाही

या प्रकरणी त्यांनी मातोश्रीपर्यंत दाद मागितली.
Shiv Sena members did not even listen to Anil Desai and Adhalrao in the no-confidence motion case
Shiv Sena members did not even listen to Anil Desai and Adhalrao in the no-confidence motion case

पुणे : खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात शिवसेनेच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली. या ठरावामागे खेड तालुक्यातील राष्ट्रवादी असल्याचे समजताच शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घेत शिवसेना सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हा वाद शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्यापर्यंत नेला. या प्रकरणी त्यांनी मातोश्रीपर्यंत दाद मागितली. मात्र, शिवसेनेच्या सदस्यांनी देसाई आणि आढळराव यांचेही ऐकले नाही, हे अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सिद्ध झाले. (Shiv Sena members did not even listen to Anil Desai and Adhalrao in the no-confidence motion case)  

सभापती पोखरकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर शिवसेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर ह्या सूचक होत्या. आपसात ठरलेली तडजोड पाळून राजीनामा न दिल्यामुळेच त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्याचा दावा सदस्यांकडून करण्यात आला होता. मात्र, ह्या ठरावासाठी शिवसेना सदस्यांना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस होती, हे आता उघड झाले आहे. कारण, शिवसेनेच्या सदस्यांनी तो आणलाच मुळात राष्ट्रवादीच्या साहाय्याने. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही प्रमुख पक्षातील वाद खेड तालुक्यात मात्र विकोपाला गेला आहे. 

या अविश्वास ठरावानंतर शिवसेनेचे सदस्य पक्षात राहतील की नाही, याची चर्चा सुरू झाली. कारण, निवडणुकीला अवघे आठ महिने उरले आहेत आणि शिवसेना सदस्यांच्या गटाची नोंदणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेली नाही. त्यामुळे व्हिपचाही परिणाम होणार नव्हता. त्यातूनच शिवसेना नेत्यांनी आपल्या सदस्यांना समजावण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो सफल झाला नसल्याचे ठराव मंजूर झाल्यानंतर दिसून येते.  

शिवसेना सदस्यांच्या बंडाला आमदार मोहिते यांचा आशीर्वाद असल्याचे लक्षात येताच खासदार आढळराव हे मैदानात उतरले. त्यांनी आपल्या परीने शिवसेनेच्या सदस्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच, यामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा संदेश त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपर्यत पोचविला. शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या कानावर त्यांनी ही गोष्ट घातली. त्यांच्याकडूनही शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. तसेच, आढळराव यांनी खुद्द मातोश्रीपर्यंत या प्रकरणी दाद मागितली होती. मात्र, शिवसेनेच्या सदस्यांनी कोणालाही दाद न देता अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

ज्या दिवशी पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्याचदिवशी शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनीही ‘याविषयावर आताच प्रतिक्रिया देणार नाही. कारण, हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठच यावर प्रतिक्रिया देतील,’ असा सावध पवित्रा घेत हा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचे पहिल्याच दिवशी सूचित केले होते.

दरम्यान, अविश्वास ठरावाच्या निमित्ताने आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा अंक रंगला हेाता. दोघांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com