मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचरच्या सरपंचपदाची निवडणूक उद्या (मंगळवारी, ता.9 फेब्रुवारी) होत आहे. सरपंचपदी महाविकास आघाडीच्या किरण देविदास राजगुरु (शिवसेना) या महिला सदस्याची बिनविरोध निवड निश्चित आहे. पण, उपसरपंचपदासाठी मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये चुरस आहे, त्यामुळे या पदावर कोणत्या पक्षाच्या सदस्याची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या 17 सदस्यांपैकी महाविकास आघाडीचे 16 सदस्य निवडून आले आहेत. या सर्व सदस्यांनी सोमवारी (ता. 8 फेब्रुवारी) कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आशीर्वाद घेऊन त्यातील 14 सदस्य कोकण दर्शनासाठी रवाना झाले आहेत.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने आघाडी करत मंचरची निवडणूक लढवली होती. मंचरच्या विकासासाठी आघाडीच्या सदस्यांनी एकोप्याने काम करावे, अश्या सूचना वळसे पाटील आणि आढळराव यांनी दिल्या. त्यानंतर 14 सदस्य कोकण दर्शनासाठी रवाना झाले.
वैयक्तीक अडचणींमुळे आम्ही दौऱ्यावर गेलो नाही. पण आम्ही महाविकास आघाडीबरोबरच आहोत, असे ग्रामपंचायत सदस्य कैलास गांजाळे व ज्योती निघोट यांनी स्पष्ट केले आहे.
आंबेगाव पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, सुनील बाणखेले, शरद बॅंकेचे संचालक दत्ता थोरात, राजेंद्र थोरात, कॉंग्रेसचे जे. के. थोरात, मंगेश बाणखेले यांच्यासमवेत नवनिर्वाचित विशाल मोरडे, दीपाली थोरात,ज्योती निघोट, सविता दिनकर क्षीरसागर, रंजना शेटे, किरण राजगुरू, सतीश बाणखेले, ज्योती प्रकाश थोरात, ज्योती संदीप बाणखेले, युवराज प्रल्हाद बाणखेले, वंदना कैलास बाणखेले, सुप्रिया शिवप्रसाद राजगुरव, पल्लवी लक्ष्मण थोरात, माणिक संतोष गावडे, कैलास गांजाळे, अरुण बाणखेले सदस्यांनी आढळराव पाटील व वळसे-पाटील यांची भेट घेतली.
सरपंच व उपसरपंच पदाबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार वळसे पाटील व आढळराव पाटील यांना दिले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सात ते आठ सदस्य माझ्याबरोबर असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली, अशी चर्चा सुरू झाली होती. पण महाविकास आघाडीचे सोळा सदस्य एकत्र असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे महाविकास आघाडी एकसंघ असल्याचे दिसून येते.
सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आहे. राजगुरू ह्या एकमेव उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपसरपंचपदी संधी मिळण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य प्रयत्न करत आहेत.

