सभापतींचा राजीनामा अन् राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग - Shirur Agricultural Produce Market Committee Chairman Shankar Jambhalkar resigns | Politics Marathi News - Sarkarnama

सभापतींचा राजीनामा अन् राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

नितीन बारवकर 
शुक्रवार, 11 जून 2021

या पार्श्वभूमीवर आमदार पवार, माजी आमदार गावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काळे आदींनी आगामी निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.

शिरूर : पक्षश्रेष्ठींनी नेमून दिलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने व इतरांनाही संधी मिळावी, या उद्देशाने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी शुक्रवार (ता. ११ जून) आपल्या पदाचा राजीनामा दिला. आमदार ॲड. अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांनी पत्रकार परिषदेत या राजीनाम्याची माहिती देताना बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. (Shirur Agricultural Produce Market Committee Chairman Shankar Jambhalkar resigns) 

आमदार ॲड. पवार व जांभळकर यांच्यासह माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार व शशिकांत दसगुडे; तसेच आबाराजे मांढरे, ॲड. सुदीप गुंदेचा, प्रवीण चोरडिया, बंडू जाधव व सतिश कोळपे हे संचालक यावेळी उपस्थित होते. शंकर जांभळकर यांनी गेल्या वर्षभरात बाजार समितीचे सभापती म्हणून केलेल्या कामांचा व राबविलेल्या वैविध्यपूर्ण योजनांचा कार्य अहवाल यावेळी आमदार ॲड. पवार यांनी सादर केला. 

हे ही वाचा : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे: चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमटा

ते म्हणाले, ''तालुक्याचे माजी आमदार (स्व.) रावसाहेबदादा पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सन १९६२ ला बाजार समितीची स्थापना केली. शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेवून स्थापलेल्या या संस्थेच्या लौकीकात अनेकांनी आपापल्या परीने भर घातली. मध्यंतरी चूकीच्या लोकांच्या हातात ही संस्था गेल्यावर ती तोट्यात गेली. कर्जबाजारी झालेल्या या संस्थेला कामगारांचे पगार देणेही मुश्कील झाले होते. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी विचारांच्या ताब्यात ही संस्था आल्यावर सुरवातीला शशिकांत दसगुडे यांनी विविध योजनांतून संस्था कर्जमुक्त केली. त्यानंतर शंकर जांभळकर यांना सभापतीपदाच्या संधीचे सोने करताना अभ्यासू नियोजन, वैविध्यपूर्ण कामे, करवसूली आणि विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत संस्थेच्या कारभारावर कळस चढविला. कर्जाच्या खाईत बुडालेली संस्था सुमारे दोन कोटी रूपये शिलकीत आणली.'' शेतकरी हिताच्या अनेक नावीन्यपूर्ण योजना जांभळकर यांनी राबविल्याचेही आमदार पवार यांनी नमूद केले. 

शेतकरी हिताला प्राधान्य देताना बाजार समितीच्या कर्मचा-यांना कोरोना कवच म्हणून विमा संरक्षण दिले, सातवा वेतन आयोग लागू केला, असे जांभळकर यांनी सांगितले. गेल्या वर्षभराच्या काळात पारंपारिक योजना व कामे करताना ई - नाम, अण्ड्रॉईड मापाडी ॲप, कडता सिस्टीम, जनावर बाजार, तेलबिया बाजार या योजना अधिक प्रभावीपणे राबविल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिर, एंटीजेन चाचणी शिबिर, पर्यावरण संवर्धनासाठी एक हजार वृक्षलागवड, तालुक्यातील कोवीड केअर सेंटरला धान्य, फळे, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

हे ही वाचा :  राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

शिरूर बाजार समितीची निवडणूक वर्षभरावर आली असून, नजीकच्या काळात इतरही निवडणूका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पवार, माजी आमदार गावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काळे आदींनी आगामी निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. तालुक्यातील सर्व संस्थांवर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व असून, ते अधिक मजबूत करण्यासाठी, चांगल्या विचारांच्या लोकांच्या नेतृत्त्वाखालील या संस्थांच्या प्रगतीसाठी या संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असणे गरजेचे असून, त्यादृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन नेतेमंडळी व पदाधिका-यांनी केले. 

शिरूर बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या अर्धपुतळ्याच्या जागी लवकरच पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. जून्या कार्यालयीन इमारतीच्या ठिकाणी नवी अद्ययावत, सुसज्ज इमारत उभारण्याचे नियोजन आहे. तळेगाव ढमढेरे येथेही बाजार समितीचे व्यापारी संकुल उभारले जाणार असून, त्यासाठीचा प्लॅन मंजूर केला आहे. ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणा-या मुलींसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त विद्यार्थी वसतिगृह उभारणार असल्याचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख