शरदरावांनी मला वेड लावले : सुशीलकुमार शिंदे  - Sharad Pawar drove me crazy about agriculture: Sushilkumar Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

शरदरावांनी मला वेड लावले : सुशीलकुमार शिंदे 

प्रमोद बोडके 
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

ताटातूट करण्याचा प्रयत्न करणारे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे व जवळचेच आहेत.

सोलापूर : "आम्ही 1978 मध्ये सर्वजण कॉंग्रेस पक्षात एकत्र होतो. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये फाटाफूट झालेली नव्हती. सोलापुरातील कारंबा गावाजवळ शरद पवारांनी माझ्यासाठी पाच एकर शेती बघितली. शेतीकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी मला केली. त्यावेळी मी नकार दिला. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपदाची संधी हुकल्याने मी शेतीकडे लक्ष द्यायचा निर्णय घेतला आणि बारा एकरांपासून शेतीला सुरुवात केली. आता ती 34 एकरांपर्यंत वाढत गेली आहे. माझ्या शेतीमालाला शरदरावांमुळे इतरांपेक्षा अधिक दर मिळत गेला. माझी शेती बघण्यासाठी पवार बलराम जाखड यांना घेऊन आले होते. शरदरावांनी मला शेतीचे वेड लावले,'' अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज आठवणींना उजाळा दिला. 

सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील दत्तात्रेय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नवीन द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा आज (ता. 13 फेब्रुवारी) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी ही आठवण सांगितली. 

शरदराव आणि माझ्यात कसलेही अंतर नाही. शरदरावांनी मला आताच द्राक्ष भरविल्याचे तुम्हीही पाहिले आहे. त्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल असा दाखलाही शिंदे यांनी त्यांच्या भाषणात दिला. 

माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढे मोठे करण्याचा हा अद्‌भूत चमत्कार शरदरावांमुळे शक्‍य झाला. शरदरावांचे माझ्यावर राजकीय प्रेम असो वा नसो आमच्यात अद्यापही मैत्री आहे. आमच्यात ताटातूट करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. ताटातूट करण्याचा प्रयत्न करणारे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे व जवळचेच आहेत. शरदरावांनी अशा व्यक्तींना कधीही थारा दिला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा घेऊन शरदराव काम करत असल्याने त्यांनी अशा गोष्टींना थारा दिला नसल्याचेही सुशीलकुमार शिंदे यांनी या वेळी आवर्जून सांगितले. 

अंतुलेंनी काय केले माहिती नाही : पवार

तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी तुमच्या बाबतीत काय केले, हे मला माहिती नाही; परंतु तुम्ही तुमची शेती चांगली केली असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबतीत काढले. सुशीलकुमार शिंदे मंत्री होते; म्हणून त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळत होता की काय? असा चिमटाही पवारांनी त्यांच्या भाषणात काढला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख