उरुळी, लोणीत रंगणार घोडेबाजार; कुंजीरवाडीत घुले गटाला लॉटरी 

प्रमुख 15 ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असल्याचे आरक्षणावरुन स्पष्ट झाले.
Sarpanch post of Uruli Kanchan, Loni Kalbhor Gram Panchayat open
Sarpanch post of Uruli Kanchan, Loni Kalbhor Gram Panchayat open

लोणी काळभोर (जि. पुणे)  : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 15 जानेवारीला निवडणूक झालेल्या हवेली तालुक्‍यातील 54 आणि आगामी काळात निवडणूक होणाऱ्या 34 अशा 88 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) सकाळी जाहीर झाले.

हवेलीसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उरुळी कांचन, लोणी काळभोर या बड्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहिले आहे. पिसोळी, कल्याण, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भावडी, गोऱ्हे बुद्रूक, कोंढणपूर, शिंदवणे, सोरतापवाडी, खामगाव मावळ, वाडे बोल्हाई, कोंढवे धावडे, किरकटवाडी, खडकवासला या प्रमुख 15 ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असल्याचे आरक्षणावरुन स्पष्ट झाले. 

दरम्यान, आजच्या आरक्षणामुळे लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलचा सरपंच होणार, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, उरुळी कांचन ग्रामपंचायतीची निवडणूक मात्र पक्षनिहाय अथवा पॅनेलनिहाय लढली गेली नसल्याने सरपंचपदासाठी ग्रामपंचायत स्तरावरील विविध गट एकत्र येणार असल्याने घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत. 


हवेली तालुक्‍यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 54 ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली. या 54 ग्रामपंचातींबरोबरच पुढील दोन वर्षांत 34 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हा परिषदेच्या जन्या इमारतीमधील महात्मा गांधी सभागृहात (पंचायत समिती हवेली) हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर व हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. 

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन, सोरतापवाडी, थेऊर, कुंजीरवाडी, शिंदवणे या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुरुष की महिला आरूढ होणार? आपल्या गावचा सरपरंच कोणत्या प्रवर्गातील असणार? आपल्याच गटाचा असणार की समोरच्या गटाचा असणार याकडे अकराशेहून अधिक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष लागून राहिले होते. या आरक्षण सोडतीमुळे या प्रश्नांना पूर्णविराम मिळालेला आहे. 


एकमेव सदस्य निवडून आलेल्या घुले गटाकडे कुंजीरवाडीचे सरपंचपद 

पूर्व हवेलीमधील राजकीयदृष्ट्या संवदेनाशिल समजल्या जाणाऱ्या कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. नुकतेच झालेल्या निवडणुकीत श्रीनाथ ग्रामिन बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे व संतोष कुंजीर यांच्या गटाचे सतरापैकी नऊ सदस्य निवडून आले आहेत. अरुण घुले गटाचा अनुसुचित जातीचा एकमेव सदस्य निवडून आला आहे. सहा सदस्य दोन स्थानिक आघाडीचे, तर एक सदस्य अपक्ष निवडून आलेला आहे. संदीप धुमाळ गटाकडे अनुसुचित जातीचा सदस्य नसल्याने अरुण घुले गटाला सरपंचपदाची लॉटरी लागणार आहे. 

शिंदवणेत अण्णासाहेब महाडिकांची पत्नी होणार सरपंच 

दुसरीकडे, शिंदवणे ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच अण्णासाहेब महाडीक गटाची पुन्हा एकदा सत्ता आली असून, पुढील पाच वर्षांसाठी सरपंच सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने पुढील सरपंच अण्णासाहेब महाडीक यांची पत्नीच असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


उरुळी कांचनमध्ये घोडेबाजार रंगणार 

उरुळी कांचन ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षविरहीत व पॅनेलविरहीत लढवली गेली होती. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सतराही जागा, विविध गटांनी आपापल्या पद्धतीने एकत्र येत सोयीनुसार आघाड्या करुन लढविल्या होत्या. मागील पाच वर्षांपूर्वीही हाच प्रयोग उरुळी कांचनच्या राजकारणात रंगला होता. मागील पाच वर्षांत सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेला सावळा गोंधळ पाहता पुढील पाच वर्षेही हाच प्रयोग उरुळी कांचनच्या ग्रामपंचायतीत चालणार आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रर्वगातून विद्यमान जिल्हा परीषद सदस्या किर्ती कांचन यांचे पती, अमितबाबा कांचन, माजी सरपंच अश्विनी कांचन याचे पती राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब कांचन हे प्रमुख इच्छुक निवडून आले आहेत. उरुळी कांचनचे यापूर्वीचे राजकारण लक्षात घेता, सरपंचपदासाठी घोडेबाजार रंगणार याबाबत उरुळी कांचन व परीसरात चर्चा रंगू लागली आहे. 


हवेली तालुक्‍यातील सरपंचपदाचे आरक्षण पुढील प्रमाणे 

सर्वसाधारण प्रवर्ग : लोणी काळभोर, उरुळी कांचन, मनेरवाडी, रहाटवडे, शिवापूर, वडगाव शिंदे, आंबी, भवरापूर, जांभळी, केसनंद, कोरेगाव मूळ, मांजरी खुर्द, मांडवी बुद्रूक, नायगाव, पेठ, प्रयागधाम, शिंदेवाडी, सांगवी सांडस, तरडे, वढू खुर्द, वळती, फुलगाव, वाघोली, नांदेड. 

सर्वसाधारण प्रवर्ग महिला : सोरतापवाडी, शिंदवणे, शेवाळेवाडी, वडाची वाडी, पिसोळी, कल्याण, मांगडेवाडी, गोगलवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, बिवरी, भावडी, गोऱ्हे बुद्रूक, कोंढणपूर, पिंपरी सांडस, आहिरे, खामगाव मावळ, वाडे-बोल्हाई, किरकटवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, खडकवासला, मांजरी बुद्रूक, नऱ्हे. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग : होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, आर्वी, गाउडदरा, खेड शिवापूर, श्रीरामनगर, हिंगणगाव, खडकवाडी, न्हावी सांडस, थेऊर, कदमवाकवस्ती, कोलवडी साष्टे. 

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : मालखेड, आष्टापूर, बहुली, गोऱ्हे खुर्द, शिरसवाडी, सोनापूर, बुर्केगाव, पेरणे, नांदोशी, डोणजे, निरगुडी, लोणीकंद. 

अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला) : खानापूर, मांडवी खुर्द, आगळंबे, डोंगरगाव, तुळापूर, कुडजे व बकोरी. 

अनुसुचित जाती प्रवर्ग : वडकी, कुंजीरवाडी, वरदाडे, आव्हाळवाडी, आळंदी म्हातोबाची, जांभूळवाडी-कोळेवाडी व सांगरूण. 
अनुसुचित जमाती प्रवर्ग (महिला)  : खामगाव टेक. 
अनुसुचित जमाती प्रवर्ग : घेरासिंहगड. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com