...अन्‌ वळसे-पाटील, आढळरावांची डोकेदुःखी कमी झाली  - Sarpanch post of Manchar, Ghodegaon, Avsari Khurd reserved; Mahilaraj for the third time in kalamb | Politics Marathi News - Sarkarnama

...अन्‌ वळसे-पाटील, आढळरावांची डोकेदुःखी कमी झाली 

डी. के. वळसे पाटील 
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

कळंब ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा महिलाराज आले आहे.

मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) जाहीर झाले. त्यानुसार मंचर, काळेवाडी-दरेकरवाडी येथे अनुसूचित जाती महिला, तर घोडेगाव, एकलहरे, जारकरवाडी, थुगाव, येथे अनुसूचित जमातीची महिला, तर अवसरी खुर्द, गावडेवाडी, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, लाखणगाव येथे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले.

त्यामुळे विशेषतः मंचर, अवसरी खुर्द, वळती, घोडेगाव, शिंगवे, पिंपळगावतर्फे महाळुंगे या मोठ्या ग्रामपंचायतीतील खुल्या प्रवर्गातील सदस्यांचा हिरमोड झाला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी चुरस होणार नसल्याने राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची डोकेदुःखी कमी होणार आहे. 

निरगुडसर, कुरवंडी, निघोटवाडी, नागापूर, भागडी, खडकी, काठापूर बुद्रुक, पेठ, लोणी, मेंगडेवाडी, वडगावपीर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे येथील सदस्यांमध्ये पदासाठी चुरस दिसून येत आहे. येथे सरपंच पदासाठी जोरदार घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत. 

मंचर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन लढले होते. शिवसेनेला येथे सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदासाठी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील अनेक मातब्बर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पण, येथे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे, त्यामुळे इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. किरण देविदास राजगुरू (महाविकास आघाडी-शिवसेना) ह्या एकमेव मंचरमध्ये सरपंचपदाच्या दावेदार असणार आहेत. 

कळंब ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा महिलाराज आले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण ग्रामपंचायत सदस्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. महाळुंगे पडवळ, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, खडकवाडी, धामणी, अवसरी बुद्रुक, रांजणी, पारगावतर्फे खेड येथे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख