शिरूर, बारामती व खेडमधील सरपंच निवडी 16 तारखेपर्यंत स्थगित  - Sarpanch elections in Shirur, Baramati and Khed postponed till February 16 | Politics Marathi News - Sarkarnama

शिरूर, बारामती व खेडमधील सरपंच निवडी 16 तारखेपर्यंत स्थगित 

भरत पचंगे 
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे. 

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर, खेड व बारामतीमधील अनुक्रमे शिक्रापूर, भोसे व निंबुत ग्रामपंचायतींच्या उच्च न्यायालयातील याचिकेवरील आदेशानुसार या तीनही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडी स्थगित करून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या तीनही तालुक्‍यातील मंगळवारी आणि बुधवारी (ता.9 आणि ता.10 फेब्रुवारी) होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडी ता. 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

उर्वरित नऊ तालुक्‍यांतील सर्व गावातील सरपंच निवडी निर्धारीत वेळापत्रकानुसार ता.9 व 10 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबतची माहिती शिरुरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली. 

शिक्रापूर, भोसे व निंबूत ग्रामस्थांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सरपंचपदाच्या आरक्षणावरून याचिका दाखल केल्या होत्या. त्यानुसार उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणीचे अधिकार दिले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे. 

दरम्यान, यापूर्वीच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ज्या तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणावर जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत. त्या संपूर्ण तालुक्‍यातील सरपंचपदाच्या निवडी 16 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील एकुण 746 ग्रामपंचायतींपैकी शिरूर, खेड व बारामती तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींमधील सरपंच निवडी वगळता हवेली, मुळशी, भोर, वेल्हे, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर आदी तालुक्‍यांतील सरपंचपदाच्या निवडी निर्धारीत वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

सुनावणीनंतर ठरणार सरपंच निवडीच्या तारखा 

येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत या तीनही ग्रामपंचायतींच्या याचिकाकर्त्यांच्या तक्रारीवरुन सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी पुढील निर्णय घेतील. पण उच्च न्यायालयाने 16 तारखेपर्यंत वरील सुनावणीला मुदत दिल्याने त्यानंतर म्हणजेच 16 फेब्रुवारीनंतर या तीनही तालुक्‍यांतील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख