कर्मचाऱ्यांना हाताशी धरून वाळूमाफियांनी तहसील कार्यालयातूनच पळवला ट्रक 

आज या सर्वांना शिरूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
 sand mafia hijacked the truck .jpg
sand mafia hijacked the truck .jpg

शिरूर : शिरूरच्या वाळूमाफीयांची मजल वाढत चालली आहे. महसूल विभागाने वाळूसह पकडलेला व शासकीय निगराणीखाली असलेला ट्रक या वाळूचोरांनी महसूल विभागातील काही कर्मचा-यांना हाताशी धरून तहसिल कार्यालयाच्या आवारातून पळवून नेला व दंड कमी करण्याच्या उद्देशाने त्यातील वाळू कुठेतरी टाकून देऊन पुन्हा जागेवर आणून लावला. सीसीटीव्हीतून हा प्रकार उघडकीस आल्याने, शिरूर पोलिसांनी महसूल सहायक, शिपाई व ट्रकमालकासह सहाजणांना आज रविवारी (ता. २१ मार्च) अटक केली. यात शिरूरच्या खरेदी-विक्री संघाच्या संचालकाचा समावेश आहे. 

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ४ मार्चला शिरूरच्या मंडल अधिका-यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक (क्र. एमएच १२ आरएम ९९७०) निमोणे जवळील कु-हाडवाडी (ता. शिरूर) येथे जप्त केला होता. सहा ब्रास वाळू भरलेल्या या ट्रकचा घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर तो वाळूसह तहसिल कार्यालयाच्या आवारात आणून लावला होता. याबाबत तहसिलदार लैला शेख यांनी संबंधित ट्रकचा मालक विजय धोंडीबा कोळपे (रा, कु-हाडवाडी, निमोणे, ता. शिरूर) याला वाळू व ट्रकच्या दंडापोटी एकूण चार लाख ७ हजार ७७५ रूपये दंडाची नोटीस दिली होती. 

दरम्यान, काल (ता. २० मार्च) या ट्रकमधील वाळू अचानक कमी झाल्याची चर्चा झाल्यानंतर व त्याबाबत नागरीकांच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर शिरूर पोलिसांनी हा ट्रक जेथे लावला होता त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. तेव्हा शुक्रवारी (ता. १९) रात्री पावणेबाराच्या सुमारास हा ट्रक घटनास्थळाहून हलविल्याचे व तासाभराने पुन्हा आणून लावल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, ट्रकमालक विजय कोळपे याने महसूल सहायक संभाजी सुकलाल गुंजाळ, महसूल शिपाई नारायण गणपत डामसे यांच्या मदतीने हा ट्रक बाहेर काढल्याचे व त्याला या कामात सुरेश ठकाजी पाचर्णे (रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर), संतोष अशोक गिरमकर (रा. कु-हाडवाडी, निमोणे, ता. शिरूर) व महेश गणपत अनुसे (रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी मदत केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमधून निष्पन्न झाले.

याबाबत शिरूरचे तलाठी सरफराज तुराब देशमुख यांनी फिर्याद दिल्यानंतर शिरूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून ट्रकमालक कोळपेसह सर्व सहाजणांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध वाळूचोरीचा व शासकीय निगराणीतील वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज या सर्वांना शिरूर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सहा ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केल्यानंतर, तहसिलदारांनी पाचपट दंडाची नोटीस बजावली होती. परंतू, हा दंड कमी करण्यासाठी ट्रकमध्ये कमी वाळू होती, असे भासविण्यासाठी हायवा ट्रक मालक याने त्याचे काही वाळूमाफीया साथीदारांच्या मदतीने महसूलच्या काही कर्मचा-यांना हाताशी धरून कट रचला. खरेदी-विक्री संघाच्या संचालकाने त्याला या कामात मदत केल्याची चर्चा आहे.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com