साहेब...कातर थांबली;पण खर्च थांबेना म्हणून जीव मुठीत धरून दहाव्याचे केस कापतोय!

लॅाकडाऊनच्या अगोदर काही लोक घरी दाढी करत. मात्र...
Salon businessman in trouble as shops closed due to lockdown
Salon businessman in trouble as shops closed due to lockdown

केडगाव (जि. पुणे)  ः ‘लॅाकडाऊननं (Lockdown) आमचं कंबरडं मोडलंय. कातर थांबली पण खर्च काही थांबेना. साहेब कोरोनामुळे (Corona) जगणं मुश्कील झालंय. कोरोनामुळे लोक मरत्यात. त्यांच्या दहाव्याला जीव मुठीत धरून केस कापायला नाईलाजाने जावं लागतंय. भीक मागता येत नाही; म्हणून हे काम करावं लागत आहे. जीव धोक्यात घालून जगण्यासाठी धडपड करावी लागते. आम्हाला कुणी वाली नाय,’ दौंड (Daund) तालुक्यातील केडगावचे गोरख यादव (Gorakh Yadav) स्वतःची व्यथा सांगत असताना समाजाचं वास्तव चित्रच जणू मांडत होते. (Salon businessman in trouble as shops closed due to lockdown)
 
कोरोना महामारीचे दुसरे वर्ष सुरू आहे. अनेकजण या एकाच व्यवसायावर अवलंबून आहेत. गेली सव्वा वर्ष व्यवसाय विस्कळीत झाल्याने नाभिक समाज मेटाकुटीला आला आहे. या समाजाला मदत करण्याची मागणी होत आहे. 

दौंड तालुक्यातील 590 कुटुंबे या व्यवसायात आहेत. यातील 90 टक्के नाभिकांचे भाड्याच्या जागेत व्यवसाय आहेत. गेल्या वर्षी लॅाकडाऊन झाले, तेव्हा काही पैसे शिल्लक होते त्यावर कशी तरी गुजराण झाली. मात्र यंदा कठीण परिस्थिती आहे. गाळाभाडे, विमा हप्ते, कर्जाचे हप्ते, विजबील, भिशी, बचत गटाचे हप्ते, गृह कर्ज थकले आहे. किराणा दुकानची उधारी वाढत चालली आहे. चक्रवाढ व्याज पद्धतीमुळे कर्जाच्या रकमा फुगत चालल्या आहेत, अशी जवळपास सर्वांची परिस्थिती आहे.

वरवंड येथील मारुती पंडीत म्हणाले, ‘‘लॅाकडाऊनच्या अगोदर काही लोक घरी दाढी करत. मात्र, लॅाकडाऊनपासून लोक घरी कटिंगसुद्धा करू लागले आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता पुन्हा कडक लॅाकडाऊनच्या भीतीने नाभिक समाज धास्तावला आहे. लॅाकडाऊन संपल्यानंतर मुलामुलींची लग्न कशी करायची हा मोठा प्रश्न आहे. मुलांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. अनेकजण दारोदारी फिरून भाजीपाला विकू लागले आहेत. मात्र, व्यवसायाची माहिती नसल्याने त्यात तोटा होत आहे. महिलांना शेतमजुरी करावी लागत आहेत.'' 

नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष गणेश साळुंके म्हणाले, ‘‘लॅाकडाऊनचे भूत समाजाच्या मानगुटीवर बसले आहे. मागली लॅाकडाऊनपासून राज्यात 18 नाभिक व्यावसायिकांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने वेश्या, रिक्षावाल्यांचा विचार केला मात्र नाभिक समाजाला दुर्लक्षित केले आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. सरकारने आर्थिक मदत करून कर्जावरील व्याज माफ करावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनं दिली आहेत. परंतू त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com