दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका; काँग्रेसमुळे सत्तेत आहात!  - Remember that you are in power because of Congress: Raju Waghmare  | Politics Marathi News - Sarkarnama

दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका; काँग्रेसमुळे सत्तेत आहात! 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 जुलै 2021

पुणे-नाशिक रस्तेमार्गाच्या श्रेयावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात पत्रकबाजी या आधीपासून सुरू होती.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॅा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेनेही उत्तर दिले. त्यामुळे सोशल मीडियावर चोरदार चर्चा रंगल्या आहेत. आता या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. (Remember that you are in power because of Congress: Raju Waghmare) 

पुणे-नाशिक रस्तेमार्गाच्या श्रेयावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यात पत्रकबाजी या आधीपासून सुरू होती. नारायणगाव येथील बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उदघाटनावरून दोन्ही नेत्यांत थेटपणे टीकाटिप्पणी सुरू झाली. आढळराव यांनी शुक्रवारीच या मार्गाचे उदघाटन करून आपणच हे काम आणले आणि पूर्ण केल्याचा दावा केला. अमोल कोल्हे यांनी शनिवारी तेथे जाऊन या कामाची फित कापली.

हेही वाचा : शिवसेनेची खासदार कोल्हेंवर कडवट टीका : सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका

या संदर्भात काँग्रेस प्रवक्ते डॅा. राजू वाघमारे यांनी ट्वीट आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की ''खासदार कोल्हे म्हणतात पवार साहेबांन मुळे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत पण कृपा करून दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका काँग्रेस मुळे आपण सत्तेत आहात, तसा विसर पडत नाही म्हणा पण आठवण दिलेली बरी'' असे वाघमारे यांनी म्हटले आहे. 

कोल्हे काय म्हणाले होते? 

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग व्हावा, ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची इच्छा होती. त्याचे सर्वेक्षण सुरेश कलमाडी यांच्या काळापासून सुरू आहे. तीन वेळा निवडून दिल्यावर त्याचा पाठपुरावा करणे माजी खासदारांचे कर्तव्यच होते. त्यांचे सरकार असतानाही त्यांना रेल्वेचा डीपीआर सभागृहापुढे आणता आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारच्या २० टक्के भागीदारीला मान्यता दिली. त्यानंतर मी पाठपुरावा केला व काम मार्गी लागले.पण मला कशाचे श्रेय घ्यायचे नाही. मी लोकांचा सेवक आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे.' 

शिरूर मतदारसंघात शिवसेनेने सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे पक्षवाढीसाठी नसून फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्याचा कार्यक्रम आहे. त्यांच्यामुळे शिरूर मतदारसंघात महाविकास आघाडी राहिली नाही. खरंतर निवडणूक झाल्यावर राजकारण विसरून विकासकामे केली पाहिजेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर शरद पवारांचा वरदहस्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी सुनावले. 

अमोल कोल्हेच्या टीकेला शिवसेनेचे उत्तर...

टिकेची शिवसेनेने दखल घेतली आणि थेट मुख्यालयातूनच या टिकेला उत्तर देणारे पत्रक प्रसिद्धिस दिले. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे बळेबळे खासदार असा अमोल कोल्हे यांचा उल्लेख यात केला आहे. कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे, असा टोला लगावला आहे.

हेही वाचा : पहिल्याच भेटीत गृहमंत्री वळसे पाटलांच्या पोलिसांना कानपिचक्या

अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत, असा सवाल विचारला आहे. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक अशी शंका सेनेने व्यक्त केली आहे. तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधीकधी स्मरणशक्ती विसरतात तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले , आपण ज्या उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की असे होते.

अहो, कोल्हे ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरू नका.  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार हे सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता? तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमतापण! दिग्ददर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा. फार डोके चालवू नका, असा सल्ला देत शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी दिला आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख