सर्वपक्षीयांबरोबरील संबंध ठरणार नीता ढमालेंसाठी फायद्याचे  - Relations with all parties will be beneficial for Nita Dhamale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

सर्वपक्षीयांबरोबरील संबंध ठरणार नीता ढमालेंसाठी फायद्याचे 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

सामाजिक कार्य आणि पदवीधरांसाठी केलेल्या कामाद्वारे नीता ढमाले यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे. 

पुणे : पाच जिल्हे आणि 58 तालुके असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला गती आली आहे. अपक्ष उमेदवार नीता ढमाले यांनी सामाजिक कार्य आणि आत्तापर्यंत पदवीधरांसाठी केलेल्या कामाद्वारे त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे. 

पुणे मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधरांचे प्रश्‍न आणि त्यांचा सर्वांगीण विकास या मुद्‌द्‌यांवर आतापर्यंतच्या निवडणुका होत होत्या. मात्र, गेल्या 20 वर्षांत इच्छुकांना पदवीधराचे दार खुणावू पाहत आहे. त्यातूनच विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतील इच्छुकांना हा मतदारसंघ सोयीचा वाटत आहे, त्यामुळे ही निवडणूक आता अटीतटीची होऊ लागली आहे. 

पुणे शहरातील हक्‍काचा मतदार आणि त्याभोवती विजयाचे समीकरण, अशी ओळख या निवडणुकीची होत होती. त्यामुळे राजकीय पक्षांना हा मतदारसंघ सुरक्षित होता. मात्र, 2003 पासून या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत. 

पुण्यापेक्षा जादा मतदारसंख्या ही सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनी पुणे शहराला ओव्हरटेक केले आहे. मताधिक्‍यासाठी हे जिल्हे अनुकूल असल्याचा दावा नीता ढमाले यांनी केला आहे. त्याचा प्रत्यय मागील निवडणुकीतही आला आहे. 2010, 2015 मधील निवडणुकाही चुरशीच्या झाल्या होत्या. 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थितीचा विचार करता नीता ढमाले व भाजप, राष्ट्रवादीची चुरस पाहावयास मिळत आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात राजकीय समीकरणे बदलली आहेत. 

नीता ढमाले यांचे कार्य मतदारांना माहिती आहे. भाजप व राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार हे कारखानदारीशी निगडित असल्यामुळे त्यांचा आणि या मतदारसंघाचा काय संबंध असा प्रश्‍न ढमाले विचारत आहेत. 

दरम्यान, ढमाले यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तरुण कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, विद्यार्थी संघटना आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. तसेच, माजी आमदार शरद ढमाले यांची फौजही ढमाले यांच्या सोबत असल्यामुळे त्याचाही फायदा होणार आहे. 

पुणे मतदारसंघातील 58 तालुक्‍यांमध्ये इंदापूरची मतदारसंख्या सरस आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या या तालुक्‍याची आहे. सुमारे 10 हजार 861 मतदार या निवडणुकीत निर्णायक कौल देऊ शकतात. त्यामुळे नीता ढमाले यांच्यामुळे  राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख