दूध संघातील गटबाजी पाहून सुनील केदार अवाक्‌ : एका दिवसात प्रशासक बदलले

संचालक पद गेल्यानंतर प्रशासकिय कारभारत आता जिल्ह्यातील नेत्यांचे ‘डोके’ चालू लागले आहे.
Re-appointment of Srinivas Pandhare as Administrator of Solapur District Milk Association :
Re-appointment of Srinivas Pandhare as Administrator of Solapur District Milk Association :

सोलापूर : राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आहोत, असे सांगणारे सोलापूर जिल्ह्यातील नेते जिल्हा दूध संघाच्या कारभारात मात्र धूर्त गटबाजी करत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील अंतर्गत गटबाजीचे तीव्र पडसाद सध्या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या (दूध पंढरी) कारभारात बघायला मिळत आहे. आमदार प्रशांत परिचारक व आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थक संचालकांचा गट आणि विरोधकांचा गट सध्या दूध संघाच्या प्रशासकिय कारभारात चांगलाच सक्रिय झाला आहे. संचालक पद गेल्यानंतर प्रशासकिय कारभारत आता जिल्ह्यातील नेत्यांचे ‘डोके’ चालू लागले आहे. (Re-appointment of Srinivas Pandhare as Administrator of Solapur District Milk Association)

राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था बरखास्त होत होत्या. भाजपच्या नजरेतून मात्र सोलापूर जिल्हा दूध संघ सुटला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच आणि दूध संघाच्या सत्तेत महाविकास आघाडीतील बहुतांश नेते असल्याने संघाला बळकटी मिळेल, असा विश्‍वास होता. झाले मात्र उलटे. भाजपच्या बरखास्तीच्या यादीतून सुटलेला सोलापूर जिल्हा दूध संघ महाविकास आघाडी सरकारच्या काळात बरखास्त झाला. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा, तर माजी आमदार दिलीप माने यांच्या रुपाने जिल्हा दूध संघाचे चेअरमनही शिवसेनेचे असताना दूध संघ बरखास्त झालाच कसा? हा प्रश्‍न अनेकांना पडला होता. बरखास्त झालेल्या संचालक मंडळाच्या दोन गटांत काठावरचे बहुमत असल्याने हा राजकीय डाव झाल्याचे समोर आले आहे. 

दुग्ध विभागाचे पुणे विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे सर्वात प्रथम प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आली. त्यानंतर 4 एप्रिलला प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीनिवास पांढरे यांची नियुक्ती झाली. ता. 31 मे रोजी प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांची नियुक्ती झाली आणि 1 जून रोजी पुन्हा पांढरे यांच्याकडे प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा आली. गेल्या आठवड्यात झालेल्या पांढरे-डोके-पांढरे या प्रशासक मंडळ अध्यक्षाच्या राजकीय डावपेचात जिल्ह्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांचे राजकारण पाहून राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार (सावनेर, जि. नागपूर) हे देखील अचंबित झाले. नक्की ऐकावे तरी कोणाचे? असाच प्रश्‍न पडल्याने तीन दिवसांत दोन प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दूध संघाने पाहिले. निवडणूक तोंडावर असताना जिल्हा दूध संघावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाल्याने दूध संघात आता राजकीय व्यक्तींचा येत्या काही महिन्यांत थेट हस्तक्षेप असणार नाही. आपल्या मर्जीतील प्रशासक आणण्यासाठी मात्र जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते मुंबईतील आपले वजन खर्ची घालू लागले आहेत. 
 
पांढरेंनी काळेबेरे बाहेर काढताच अनेकांचे धाबे दणाणले

दूध संघात झालेली अनियमितता, संचालकांच्या मर्जीतील कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदार यासह दूध संघाच्या कारभारातील काळेबेरे बाहेर काढायला प्रशासक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी सुरुवात केली आहे. त्यांना या पदावरुन हटवून त्यांच्या जागी नवा प्रशासक आणण्याचे काम झाले. अवघ्या एका दिवसानंतर प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे पुन्हा पांढरे यांच्याकडे आली आहेत. पांढरे हे वर्ग दोनचे अधिकारी आहेत. त्यांनी दूध संघाच्या कारभारत चांगलेच लक्ष घातल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com