करमाळ्याच्या बागल कुटुंबीयांची राष्ट्रवादीशी पुन्हा जवळीक ! 

शिवसेनेचे मुख्यमंत्री असूनही रश्‍मी बागल किंवा दिग्विजय बागल हे उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कारखान्याच्या अडचणी सोडविण्यासाठी भेटले नसल्याची चर्चा आहे.
Rashmi and Digvijay Bagal of Karmala met Sharad Pawar
Rashmi and Digvijay Bagal of Karmala met Sharad Pawar

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेची 2019 ची निवडणूक शिवसेनेकडून लढलेल्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रश्‍मी बागल, दिग्विजय बागल हे आदिनाथ आणि मकाई या सहकारी साखर कारखान्यांना अर्थिक मदत मिळावी, यासाठी बुधवारी (ता. 9 सप्टेंबर) मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटले. या भेटीचे फोटो सोशल मीडियातून व्हायलर झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत दाखल झालेल्या करमाळ्याच्या बागल कुटुंबीयांची पुन्हा राष्ट्रवादीशी जवळीक वाढली आहे. या विषयी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला कालच्या भेटीमुळे चालना मिळत आहे. 

रश्‍मी बागल या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच होत्या. त्यांच्या मातोश्री श्‍यामलताई बागल या 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदार होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत रश्‍मी बागल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा प्रचार केला होता. मात्र, लोकसभेला पराभव झाल्याने संजय शिंदे करमाळ्यातून विधानसभा लढण्यासाठी पुन्हा इच्छुक होते.

विधानसभेला शिंदे यांची मदत होण्याची शक्‍यता धूसर झाल्याने रश्‍मी बागल यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या वेळी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना बाजूला करून अटीतटीच्या परिस्थितीत शिवसेनेनेही रश्‍मी बागल यांना उमेदवारी दिली होती. 

विशेष म्हणजे रश्‍मी बागल यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांच्या प्रयत्नाने करमाळा येथे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेने उमेदवारी नाकारलेले नारायण पाटील हे अपक्ष लढून रश्‍मी बागल यांच्यापेक्षा 25 हजार मते जादा मिळविली होती, तर रश्‍मी बागल यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून गेलेल्या अनेकांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून कामे करून घेताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आधार घ्यावा लागत आहे . 

सध्याच्या परिस्थिती बागल गटाकडे असलेला आदिनाथ व मकाई हे दोन्ही सहकारी साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. या कारखान्यांना आर्थिक मदत मिळावी; म्हणून रश्‍मी बागल, त्यांचे बंधू मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल हे शरद पवार यांच्याकडे प्रयत्न करत आहेत. त्यातच मागील महिन्यात दिग्विजय बागल हे मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले होते.

कालची बैठक शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार यांच्या उपस्थितीत झाली, त्यामुळे रश्‍मी बागल या शिवसेनेतून पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत काय? या विषयी चर्चा रंगली आहे. 

विशेष म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री असूनही रश्‍मी बागल किंवा दिग्विजय बागल हे उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कारखान्याच्या अडचणी सोडविण्यासाठी भेटले नसल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या नावाखाली हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत असल्याने बागल कुटुंबीय पुन्हा राष्ट्रवादीत जाणार? अशी चर्चा तालुक्‍यात जोर धरत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com