....अन्‌ राजू शेट्टी प्रचारसभा रद्द करून शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले

ही आमची संस्कृतीच आहे.
Raju Shetty canceled the campaign rally and inspected the damage caused by the rains
Raju Shetty canceled the campaign rally and inspected the damage caused by the rains

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांचे मातब्बर नेतेमंडळी मागील काही दिवसांपासून पंढरपुरात ठाण मांडून आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टीदेखील प्रचाराच्या निमित्ताने मतदार संघात आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता. 13 एप्रिल) पंढरपूरच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यात द्राक्ष बागांचे मोठ नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच माजी खासदार शेट्टी हे प्रचार दौरा अर्धवट सोडून थेट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. तालुक्यातील ईश्वर वठार येथील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेची त्यांनी पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी नुकसान झालेल्या फळ बागांचे पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. शेट्टी यांनी दाखवलेल्या या तत्परतेची मतदारसंघात चर्चा सुरु आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे मतदार संघात मागील पंधरा दिवसांपासून तळ ठोकून आहेत. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीने सत्ताधारी महाविकास आघाडीला़च थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे येथील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शेट्टी व तुपकर हे प्रचाराच्या निमित्ताने मंगळवारी (ता.13 एप्रिल) सकाळपासूनच मतदार संघात फिरत होते. दुपारी अचानक पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागाला वादळीवारे आणि गारपिटीने झोडपून काढले. यामध्ये काढणीस आलेल्या द्राक्ष, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले. या भागात गारपीट झाल्याची माहिती मिळताच राजू शेट्टी व त्यांच्या सहकार्यांनी वाखरी येथील प्रचार सभा रद्द करुन त्यांनी थेट ईश्वर वठार या भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम
केले.

अचानक राजू शेट्टी आपल्या शेतात आल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या वेळी राजू शेट्टी म्हणाले की, राजकारणापेक्षा शेतकरी महत्वाचा आहे. जगाचा पोशिंदा जगला तरच आपण जगणार  आहोत. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, ही आमची संस्कृतीच आहे. म्हणूनच आज प्रचारदौरा सोडून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे. सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन त्यांना तातडीने हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

या वेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, माजी उपसभापती विष्णुपंत बागल, विठ्ठलचे माजी संचालक रायाप्पा हळणवर, धनाजी पाटील, उमेदवार सचिन पाटील, स्वाभिमानीचे प्रवक्ते रणजित बागल आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com