राहुल कुल यांनी अजितदादा आणि फडणवीस यांना एकत्र आणले - Rahul Kool brought Ajit Pawar and Devendra Fadnavis together | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल कुल यांनी अजितदादा आणि फडणवीस यांना एकत्र आणले

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 12 मे 2021

दोघांनीही एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते.

पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kool) यांनी आपल्या आमदार निधीतून ‘डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर'च्या माध्यमातून अत्यावस्थ रुग्णांसाठी १०० ऑक्सिजनचे बेड्स, तर ‘कोव्हीड केअर सेंटर'च्या माध्यमातून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी सुमारे २०० बेड्सची सुविधा चौफुला (ता. दौंड, जि. पुणे) (Chaufula) उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते ऑक्सिजन बेड्सचे, तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विलगीकरण सुविधेचे उद्‌घाटन करण्यात आले. (Rahul Kool brought Ajit Pawar and Devendra Fadnavis together)

या निमित्ताने पवार आणि फडणवीस हे पुन्हा एकत्र आले होते. तत्पूर्वी त्यांनी पुण्यातील भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी एकच मंचावर हजेरी लावली होती. पहाटेच्या शपथविधीपासून ते दोघे एकत्र येणार म्हटल्यावर राज्यातील राजकीय वर्तुळास कायम उत्सुकता असते. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांबाबत त्यांनी पुण्यातील कार्यक्रमात नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, हे दोन मोठे नेते एकत्र येणर म्हटल्यावर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणे अपेक्षित आहे. 

हेही वाचा : पालकमंत्री भरणेंचा वेळकाढूपणा.... राष्ट्रवादीला गोत्यात आणणार

मध्यंतरी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने दोघांनीही एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. मात्र, तो कडवटपणा विसरून पवार आणि फडणवीस हे पुन्हा राहुल कुल यांच्या कार्यक्रमाला एकत्र आले होते.

दौंड तालुक्यातील चौफुला हद्दीतील एका सभागृहात सुसज्ज हॉस्पिटलच्या धर्तीवर चोवीस तास डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्सेस, ऑक्सिजन लाईन्स, फोल्डेबल बेड्स, महिला व पुरुषांसाठी विभक्त विलगीकरण कक्ष, प्रत्येक बेड्ससाठी आवश्यक टेबल्स, वैद्यकीय उपकरणे, इतर साधने, घोषणा प्रणाली, प्रोजेक्ट्रर्स, ऍम्ब्युलन्स, जनरेटर, सिक्युरिटी, औषधांसाठी स्वतंत्र कक्ष, इन हाऊस क्लीनिंग टीम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वछतागृह आदी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी दाखल रुग्णाचे संपूर्ण उपचार, औषधे, जेवण आदी सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.

आमदार विकास निधीचा वापर करून उपजिल्हा रुग्णालयांतर्गत विस्तारित 'डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर' तसेच  'कोव्हीड केअर सेंटर' उभारण्याचा हा विशेष उपक्रम राबविल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार व विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि  कोविड केअर सेंटरसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या दोन्ही नेत्यांनी कुल यांना दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख