शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील जनता दल युवाचे (सेक्युलर) प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांच्या आत्मचरित्रपर 'नाथा' या पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते नुकतेच दिल्ली येथे पार पडले. माजी पंतप्रधान दिवंगत व्ही. पी. सिंग यांच्या पत्नी राणीसाहेब सीतादेवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. नाथा शेवाळे यांचा संपूर्ण जिवनपट, त्यांचा राजकारणातील प्रवेश ते युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास, अनेक प्रलोभनानंतरही पक्षाच्या धेयधोरणांना प्राधान्य देवून पक्षाशी एकनिष्ठ राहणारे शेवाळे यांची राजकीय कारकीर्द, तसेच कोरोना काळातील त्यांच्या कामाचा आढावा या आत्मचरित्रपर पुस्तकात आहे.
नाथा शेवाळे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत करावे, हा आग्रह माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा होता. त्यानुसारच दिल्लीतील देवेगौडा यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान दिवंगत व्ही. पी. सिंग यांच्या पत्नी राणीसाहेब सीतादेवी, तसेच बहुज समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरम्यान, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात एकदा शिरूर तालुक्याचा दौरा केला होता. त्याच्या आठवणी या वेळी राणीसाहेब सीतादेवी यांनी कथन केल्या. या वेळी देवेगौडा यांनी नाथा शेवाळे यांचे कन्नड-हिंदी वळणाच्या मराठीत कौतुक केले. सामान्य कार्यकर्त्यामुळे एखादा पक्ष कसा मोठा असतो, हे सांगताना नाथा शेवाळे यांच्याबद्दल त्यांनी भरभरून सांगितले. या वेळी सुशीलाताई मोराळे, ललित रूनवाल तसेच राज्यातील जनता दलाचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात फिरताना दौऱ्यात नाथा शेवाळे असतील, तर कुठलीच अडचण येत नाही. राज्याच्या राजकारणासह समाजकारण आणि ऐतिहासिक, सांप्रदायिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे औद्योगिक क्षेत्रातील घडामोडींची खडा न खडा माहिती शेवाळे यांना असल्याने त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील दौरा सुखकारक ठरतो, अशी भावना देवेगौडा यांनी या वेळी व्यक्त केली.

