मी सर्व डॉक्टरांच्या पाया पडतो; आता कोविड सेंटरसाठी पुढाकार घ्या : सोलापूरच्या पालकमंत्र्यांचे भावनिक आवाहन

मी दीड महिना या भागात येऊ शकलो नाही, याचा अर्थ मी गप्प होतो, असा नाही.
Private doctors in Karmala taluka should take initiative to set up Kovid Center : Dattatreya bharane
Private doctors in Karmala taluka should take initiative to set up Kovid Center : Dattatreya bharane

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता खासगी डॉक्टरांनी उपचारासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रत्येक कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पाहिजे ते कष्ट मी घेण्यासाठी तयार आहे. आता खासगी डॉक्टर मंडळींनी पुढाकार घेऊन या लढाईत सहभागी व्हावे. मी करमाळ्यातील सर्व डॉक्टरांच्या पाया पडतो; पण कोविड सेंटरसाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात आचारसंहिता असल्यामुळे मी दीड महिना या भागात येऊ शकलो नाही, याचा अर्थ मी गप्प होतो, असा नाही. जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे मी रोजच्या रोज रिपोर्ट घेत होतो. आता मात्र इथून पुढे मी जिथे अडचण असेल, तेथे जायाला तयार आहे. शंभर लोकसंख्येची वस्ती असली तरी तेथे दत्तामामा भरणे जाऊन लोकांचे प्रश्न सोडविला तयार आहे. अशा प्रसंगी राजकारण करण्यापेक्षा एकमेकांच्या अडचणी समजून अडचणीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुका आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी आमदार नारायण पाटील, शिवसेनेच्या नेत्या रश्मी बागल, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन चवरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, मनसेचे संजय घोलप, प्रातांअधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात,डाॅ.अमोल डुकरे, डाॅ.सागर गायकवाड, अभिषेक आव्हाड, असपाक जमादार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल, सविताराजे भोसले, महेश चिवटे, संजय घोलप, गहिनीनाथ ननवरे यांनी मागण्या मांडल्या. 

भरणे म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी मी आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेत आहेत. परिस्थिती सर्वत्र गंभीर आहे. आता खऱ्या अर्थाने या परिस्थितीत खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी पुढाकार घेऊन गावोगावी कोविड सेंटर उभा केली पाहिजेत. मी तळागाळात काम केलेला कार्यकर्ता असून सर्वसामान्यांच्या आरोग्य जपण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. जिथे तिथे अडचण असेल ते प्रत्येक नागरिकांनी मला थेट भ्रमणध्वनी करावा. माझा फोन  24 तास सुरू असतो. 

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शंभर कोवाड सेंटर उभा करावे, ऑक्सीजन , रेमिडिसिवहार इंजेक्‍शनचा पुरवठा पारदर्शक करावा. ऑक्सीजन व इंजेक्शनअभावी लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशा करमाळा तालुक्यातील 26 रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत द्यावी. खाजगी रुग्णालय व मेडिकलमधून जी रुग्णांची लूट सुरू आहे, त्याला पायबंद घालावा. पावती न देता मेडिसिन विकणाऱ्या औषध विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. मेडिकलमधून विक्री होत असलेल्या औषधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावेत अशा मागण्या केल्या. 

कोरोना झाल्याने आमदार संजय शिंदे अनुउपस्थित

कोरोनाची लागण झाल्यामुळे आमदार संजय शिंदे या बैठकीस उपस्थित नव्हते. तरीही कोविड संदर्भातील उपाय योजना अंतर्गत त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेले पत्र हे त्यांच्यावतीने पी. एस .कांबळे यांनी वाचून दाखवले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com