राष्ट्रवादीला दुसऱ्यांदा नाकारत शिवसेनेच्या हाती सोपवली सत्ता  - The power of Pabal Gram Panchayat is with Shiv Sena for the second time | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीला दुसऱ्यांदा नाकारत शिवसेनेच्या हाती सोपवली सत्ता 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थक असलेले मारुती शेळके यांची सरपंचपदी, तर राजाभाऊ वाघोले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. 

पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाबळला (ता. शिरूर, जि. पुणे) उमेदवारीची संधी दिली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत पाबळच्या जनतेने राष्ट्रवादीला दुसऱ्यांदा नाकारत शिवसेनेच्या हाती सत्ता सोपवली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे समर्थक असलेले मारुती शेळके यांची सरपंचपदी, तर राजाभाऊ वाघोले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. 

दरम्यान, सोपान जाधव आणि रोहिणी जाधव या माजी सरपंच जोडीने पुन्हा एकदा ग्रामपंचायतीत प्रवेश करत आपल्या राजकीय चातुर्याची चुणूक दाखवली आहे. मागील पंचवार्षिकला 12 :05 अशी सत्ता मिळविलेल्या आढळराव समर्थकांना या वेळी मात्र 10 : 07 यावर समाधान मानावे लागले आहे. 

मागील पंचवार्षिकमध्ये 12 :05 असे बलाबल असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर तालुका उपाध्यक्ष संजय चौधरी यांनी राजकीय डाव-प्रतिडाव टाकत स्वत ः उपसरपंच होत पाबळ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला सत्तेत आणले होते. तो अनुभव लक्षात घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी सतर्कता पाळून 10 : 07 अशी एकहाती सत्ता प्रस्थापित केली. 

संपूर्ण निवडणूक व्यूहरचनेत पाबळचे शिवसेना शहरप्रमुख नामदेव पानसरे, शिवाजी जाधव, संतोष साकोरे, पाबळ शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, डॉ. वसंत पिंगळे, संजय नऱ्हे आदींनी विशेष सहकार्य केल्याचे माजी सरपंच सोपान जाधव यांनी सांगितले. या मंडळींच्या सहकार्यामुळे आपण पाबळवर सत्ता प्रस्थापित करू शकल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सरपंचपदासाठी मारुती शेळके व शिवसेनेचे सचिन शिवाजी वाबळे यांनी अर्ज भरला होता. मात्र, सचिन वाबळेंनी अर्ज माघारी घेतल्याने शेळके बिनविरोध सरपंच झाले, तर उपसरपंचपदासाठी राजाराम वाघोले व सपना जाधव यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सपना जाधवांच्या अर्ज माघारीनंतर वाघोले उपसरपंचपदी विराजमान झाले. 

आढळराव-वळसे पाटलांशी उत्तम संबंध राखणारे जाधव 

माजी सरपंच सोपान जाधव म्हणजे पाबळच्या राजकारणातील कमालीचे सजग व्यक्तीमत्त्व आहे. स्वत: सरपंच राहिलेले जाधव यांनी पत्नी रोहिणी यांनाही मागील वेळी सरपंच केले होते. या वेळी ते जोडीने पुन्हा सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत पोचले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्याशी जाधव यांचा उत्तम संवाद आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख