लोणी काळभोर पुण्यात येऊन १२ दिवस होण्यापूर्वीच पोलिसांनी वाजवले कामठे टोळीचे बारा

मोका कारवाईचा ‘पुणे पॅटर्न’ वापरण्यात येईल.
Police take action against Shubham Kamthe gang at Loni Kalbhor as per Moka Act
Police take action against Shubham Kamthe gang at Loni Kalbhor as per Moka Act

उरुळी कांचन (जि. पुणे) : लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, हडपसरसह पूर्व हवेलीत विशिष्ठ संघटनेच्या नावाखाली मागील काही वर्षांपासून भाईगिरी करणाऱ्या शुभम कामठे व त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा शहर पोलिस दलात सामाविष्ठ होऊन बारा दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शुभम कामठे व त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांना योग्य तो इशारा दिला आहे. 

शहर पोलिसांनी शुभम कामठे टोळीतील दत्ता भीमराव भंडारी (वय २४, रा. पापडेवस्ती, हडपसर, ता. हवेली ), सौरभ विठ्ठल घोलप (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर), हृतिक विलास चौधरी (वय २१), साहिल फकिरा शेख (वय २१) या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईचे संकेत मिळताच शुभम कामठे व त्याचे तीन सहकारी फरारी झाले आहेत. 

शुभम कामठे टोळीबरोबरच, सोशल मिडीयावर स्वतःला डॉन म्हणवून घेणारा कदमवाकवस्ती येथील एक स्वयंघोषीत दादा व त्याची टोळीही शहर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. शहर पोलिसांनी स्वयंघोषीत डॉन व त्याच्या बगलबच्च्यावर मोका अंतर्गत कारवाईसाठीचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवला असल्याची माहितीही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

शुभम कामठे व त्याच्या टोळीवर लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी या टोळीकडे पूर्वी लक्ष दिले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी शुभम कामठे व त्याच्या सहकाऱ्यांनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एटीएम केंद्रात गेलेल्या एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. हा तरुण या घटनेत बचावला होता. मात्र, मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली होती. 

या टोळीवर कायमस्वरूपी जरब बसावी, यासाठी हडपसर पोलिसांनी उपायुक्त नम्रता पाटील यांच्या माध्यमातून मोका अंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे हा प्रस्ताव गेल्यावर त्यांनी तो तातडीने मंजूर केला.

दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांची पळताभुई थोडी केली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाणे शहर आयुक्तालयात समाविष्ट झाल्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली होती. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी मोका कारवाईचा ‘पुणे पॅटर्न’ वापरण्यात येईल, असे सांगितले होते. त्याची प्रचिती या कारवाईने आली आहे. आतापर्यंत पोलिस आयुक्तांनी २२ मोका अंतर्गत कारवाई केल्या आहेत. यापुढील काळातही गुन्हेगारांवर कारवाया सुरूच राहतील, अशी माहिती उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. 

स्वयंघोषित दादावरही लवकरच कारवाई 

सोशल मीडियावर स्वतःला डॉन म्हणवून घेणारा कदमवाकवस्ती येथील एक स्वयंघोषीत दादा, एक सोनू व त्याची टोळी मागील चार ते पाच वर्षांपासून लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे या टोळीवर अद्याप लोणी काळभोर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नव्हती. मात्र शहर पोलिसांनी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. येत्या आठवड्यात या प्रस्तावालाही आयुक्तांची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात येईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. या टोळीवर एका अट्टल गुन्हेगाराचा खून केल्याचा गुन्हा दाखल असून या सारखे अनेक गंभीर गुन्हेही दाखल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com