आमदार दिलीप मोहिते म्हणतात, विमानतळ पुन्हा खेडला द्या - Planned International Airport to be set up in Khed: Demand of MLA Dilip Mohite | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

आमदार दिलीप मोहिते म्हणतात, विमानतळ पुन्हा खेडला द्या

राजेंद्र सांडभोर 
शनिवार, 23 जानेवारी 2021

याठिकाणी संपादनाबाबतच्या फारशा समस्या नाहीत.

राजगुरुनगर (जि. पुणे) : प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागा देण्यास पुरंदर तालुक्‍यातील स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर हे विमानतळ पुरंदरऐवजी खेड तालुक्‍यातील 'एसईझेड'च्या जागेत करण्यात यावे, अशी मागणी खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी राज्य सरकारकडे केली. 

खेड पंचायत समितीत आज (ता. 23 जानेवारी) पार पडलेल्या एका कार्यक्रमानंतर आमदार मोहिते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

भारत फोर्ज कंपनीच्या "एसईझेड'च्या दीड-दोन हजार हेक्‍टर जागेत विमानतळ होऊ शकतो. "एसईझेड' बाबतची धोरणे बदलल्यानंतर उद्योजकांकडून उद्योग उभारण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने, याठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक आहे. ही जागा आधीच संपादित झालेली असल्याने याठिकाणी संपादनाबाबतच्या फारशा समस्या नसून प्रस्ताव मंजूर होऊन कामाला लवकर सुरुवात होऊ शकते. भारत फोर्ज कंपनीने सरकारकडे यासंदर्भात प्रस्ताव दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

खेड तालुक्‍यातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी विमानतळाची खूप आवश्‍यकता आहे. त्यामुळे तालुक्‍यातील एमआयडीसीचे सर्व टप्पे आणि उर्वरित एसईझेड प्रकल्पाच्या विकासाला चालना मिळेल. पिंपरी चिंचवड, भोसरी, रांजणगाव आणि चाकण या औद्योगिक क्षेत्रांना हा विमानतळ जवळचा असणारा आहे. म्हणून उद्योजकांकडूनही या परिसरात विमानतळ असावा, अशी मागणी आहे. 

याबरोबरच पुणे, नाशिक आणि नगर या जिल्ह्यांतील औद्योगिक पट्ट्यासाठी हा विमानतळ मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याने सोयीचा ठरणार आहे. 

पुरंदर तालुक्‍यातील मंजूर विमानतळाला तेथील लोकांचा तीव्र विरोध होत आहे, त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया पार पडून प्रत्यक्ष विमानतळ उभारणीस अनिश्‍चित कालावधी लागू शकतो. म्हणून "खेड एसईझेड' मधील विमानतळाचा विचार अधिक व्यवहार्य आहे. थोड्याफार तांत्रिक अडचणी असल्या तरी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांवर मात करून विमानतळ उभा राहू शकतो, असे आमदार मोहिते यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख