खासदार डॉ अमोल कोल्हेंनी पदार्पणातच पटकाविला संसदरत्न पुरस्कार  - Parliamentary Award announced to NCP MP Dr. Amol Kolhe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

खासदार डॉ अमोल कोल्हेंनी पदार्पणातच पटकाविला संसदरत्न पुरस्कार 

डी. के वळसे पाटील 
बुधवार, 17 मार्च 2021

त्याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला घ्यावी लागली होती.

मंचर (जि. पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खासदारांची संसदेतील कामगिरी पाहून चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई-मॅगेझीनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. 

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा संसदरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती या फाउंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितली. खासदारकीच्या पहिल्या पंचवार्षिकमधील पहिल्या दोन वर्षांत लक्षवेधी कामगिरी करत खासदार डॉ. कोल्हे यांनी हा संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. 

संबंधित खासदाराची संसदेतील अधिवेशन काळातील हजेरी, सभागृहातील चर्चासत्रात त्यांनी घेतलेला सहभाग आणि त्यांनी मांडलेले प्रश्‍न आदी निकषांच्या आधारावर फाउंडेशनकडून संसदरत्न पुरस्कारासाठी खासदारांना निवडले जाते. त्यात कोल्हे यांनी अवघ्या दोन वर्षांतच या पुरस्काराला गवसणी घातली आहे. 

संसदरत्न पुरस्काराचे वितरण येत्या शनिवारी (ता. 20 मार्च) होणार असून या वेळी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

लोकसभेतील एकूण 14 चर्चासत्रांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी सहभाग नोंदविला आहे. आतापर्यंतच्या संसदीय कारकिर्दीत त्यांनी एकूण 277 प्रश्‍न लोकसभेत उपस्थित केले आहेत. यामध्ये मतदारसंघातील प्रलंबित प्रश्‍नांसह इतरही लोकहिताच्या कामांचा समावेश आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या वक्तृत्वशैलीने सभागृहात छाप पाडली आहे. आपल्या प्रभावी भाषणाच्या जोरावर लोकसभा अध्यक्षांनाही त्यांच्या प्रश्‍नांची दखल घ्यावी लागली आहे. 

डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत आतापर्यंत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, बैलगाडा शर्यत, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राच्या संदर्भातील विषय मांडले आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळातही त्यांनी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयापासून नागरी विमान वाहतूक मंत्रालयापर्यंत वारंवार पाठपुरावा केला आणि परदेशात अडकलेले भारतीय विद्यार्थी व पर्यटकांना देशात आणले. 

कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी औषधासंदर्भात जनजागृती केली होती. त्याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला घ्यावी लागली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच अनेक औषधी कंपन्यांना गोळ्याच्या किमती कमी कराव्या लागल्या होत्या. शिरूर मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी खासदार कोल्हे यांनी लोकसभेत वेळोवेळी आवाज उठविलेला आहे. लोकसभेतील त्यांचे हे दोन वर्षांतील काम पाहूनच प्रतिष्ठित समजला जाणारा संसदरत्न पुरस्कार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख