भरणेंनी 41 सरपंचांची ओळख परेड करत अजितदादांचा शब्द खरा केला  - Parading the identity of 41 sarpanches, Dattatreya Bharane fulfilled Ajit Pawar's word | Politics Marathi News - Sarkarnama

भरणेंनी 41 सरपंचांची ओळख परेड करत अजितदादांचा शब्द खरा केला 

राजकुमार थोरात 
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीनंतर भरणे व पाटील यांच्यात ग्रामपंचायतीच्या वर्चस्वाचा वाद रंगला होता.

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवरील वर्चस्वावरून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र, राज्यमंत्री भरणे यांनी रविवारी (ता. 14 फेब्रुवारी) तालुक्‍यातील 60 पैकी 41 ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा सत्कार करत त्यांची ओळख परेड केली. त्यामुळे भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शब्द करून दाखवत विरोधकांचा 38 ग्रामपंचायतींवरील वर्चस्वाचा दावा खोडून काढला. 

इंदापूर तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकीनंतर राज्यमंत्री भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात वर्चस्वाचा वाद रंगला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापुरात नुकत्याच झालेल्या सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीच्या सरपंचांची एका ओळीत उभा करून ओळख परेड करतो, असे सांगितले होते. त्यानुसार राज्यमंत्री भरणे यांनी केलेल्या दाव्यानुसार आज भरणेवाडीत 41 सरपंचांचा सत्कार करत त्यांची ओळख परेड घडवून आणली. 

सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीनंतर भरणे व पाटील यांच्यात ग्रामपंचायतीच्या वर्चस्वाचा वाद रंगला होता. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (ता. 13 फेब्रुवारी) इंदापूरमध्ये नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचाचा सत्कार करून 38 ग्रामपंचायतींवर वर्चस्व असल्याचे सांगितले. मात्र, कार्यक्रमात पाटील यांनी गावानिहाय सरपंचांना उभे करून त्यांची ओळख परेड केली नव्हती. 

भरणे यांनी मात्र आज तालुक्‍यातील 60 पैकी 41 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची नावे वाचून दाखवून त्यांची ओळख परेड केली. त्यामुळे अजित पवार यांनी जाहीर सभेत जो शब्द इंदापूरकरांना दिला होता. तो भरणे यांनी आज खरा करून दाखविला. या वेळी भरणे यांनी नाव न घेता पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवली. 

भरणे यांनी म्हणाले, "इंदापूर तालुक्‍यातील विरोधकांनी 38 सरपंचांची ओळख परेड का केली नाही. माणसाने किती खोटे बोलावे यालाही मर्यादा असतात. गेली 20-35 वर्ष जनतेला खोटं सांगत आले आहेत. त्यांना शेतीच्या पाण्याचे देणे-घेणे नसून पाण्याचे फक्त राजकारण करावयाचे आहे. विरोधकांना जनतेने विश्रांती दिली असून त्यांनी विश्रांती घ्यावी.'' 

""गेली 35 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लाकडी-निंबोडीचा प्रश्‍न सोडविण्याचे काम सुरु आहे. तालुक्‍यातील शेतीचे व पिण्याचा पाणी प्रश्‍न सोडावयाचा आहे. उजनीचे पाणी शेटफळगढेमधील कालव्यात आणून टाकायचे आहे. इंदापूरच्या पाणीप्रश्‍नासाठी गरज पडल्यास शरद पवार बैठकीला येण्यास तयार आहेत. तसेच, 22 गावांचा प्रश्‍न मार्गी लावणार आहे. इंदापूरला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही,'' अशी ग्वाहीही भरणे यांनी या वेळी दिली. 

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे उपस्थित होते. 

सरपंचांचा सत्कार झालेली 41 गावे 

सपकळवाडी, पोंधवडी, लोणी देवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथुर्णे, रुई, बळपुडी, भांडगाव, हगारेवाडी, काटी, कळस, तरंगवाडी, तक्रारवाडी, लासुर्णे, शेटफळगढे, पिंपरी बुद्रूक, शहा, निमसाखर, सणसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी (निमगाव केतकी), कौठळी, जाचकवस्ती, जाधववाडी, दगडवाडी, पिठेवाडी, अकोले, नीरा नरसिंहपूर, सरडेवाडी. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख