उस्मानाबादचे आमदार, खासदार फक्त मते मागण्यासाठीच आहेत काय? - Osmanabad's MLA and MP Are the only for seeking votes? : MLA Rajendra Raut | Politics Marathi News - Sarkarnama

उस्मानाबादचे आमदार, खासदार फक्त मते मागण्यासाठीच आहेत काय?

प्रशांत काळे
मंगळवार, 20 एप्रिल 2021

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी फोन उचलत नाहीत.

बार्शी (जि.  सोलापूर)  ः बार्शी शहरात असणाऱ्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे आसपासच्या ११ तालुक्यांतील आहेत. माणुसकीच्या नात्याने आम्ही उपचार करतो आहोत आणि रुग्णांचा तो नैसर्गिक हक्क आहे. त्याही उस्मानाबाद जिल्ह्यातून येणारे रुग्ण जास्त आहेत. तेथील खासदार, आमदार फक्त मते मागण्यासाठीच आहेत का? जनतेला वाऱ्यावर सोडत आहेत. ते कारखाने उभा करतात; पण हॉस्पीटल उभा करू शकत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करून उस्मानाबाद येथील जनतेने त्यांना जाब विचारावा, असे आवाहन बार्शीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.

बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत आमदार राऊत यांनी वरील आवाहन केले.

ते म्हणाले, ‘‘उस्मानाबादचे जिल्हाधिकारी फोन उचलत नाहीत. तामलवाडी येथून ऑक्सिजनची मागणी केली, तर दिला नाही. इंजेक्शन देत नाहीत, त्यामुळे त्यांची दोन दिवस वाट पाहून त्यानंतर बार्शी तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या रुग्णांना दाखल करुन घेतले जाणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.

बार्शी शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी गंभीर असून दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. उपचाराअभावी मृत्यू होत आहेत. कोविड हॉस्पिटल, कोविड सेंटर येथील बेड शिल्लक नाहीत. ऑक्सिजन, रेडमेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी निर्णय घेतला असून दहा दिवस तालुका अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद असेल, अशी घोषणाही राऊत यांनी केली.

येथील प्रशासनाच्या अधिकारामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून कारवाई झाली तर संपर्क साधू नका. प्रशासनाच्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही. नागरिकांना अडचण आली तर नगरसेवकांशी संपर्क साधा. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल, असेही आमदार राऊत यांनी या वेळी जाहीर केले.

आमदार राऊत पुढे म्हणाले की, पाच दिवसांत केवळ २० रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्रशासनाकडून मिळाली आहेत. ऑक्सिजन उपलब्ध होत नाही, उद्योग व्यवसाय पुन्हा सुरु होतील. पण, जीव परत मिळणार नाही. लॉकडाउन केले नाही तर दहा दिवसांनी परिस्थिती हाताबाहेर जाईल.

या बैठकीस नगराध्यक्ष असिफ तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने,मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका वैद्यकीय अभिकारी डॉ. अशोक ढगे, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहायक पोलिस निरीक्षक विवाजी जायपत्रे, विश्वास बारबोले, नागेश अक्कलकोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख