सरपंच निवडीनंतर का करावी लागली जमावबंदी? 

तत्पूर्वीच निवडून आलेल्या पाच सदस्यांनी गावातून एकत्र बाहेर पडून बंडखोरी केली होती.
Order of curfew in Rahatwde village after election of Sarpanch-Deputy Sarpanch
Order of curfew in Rahatwde village after election of Sarpanch-Deputy Sarpanch

नसरापूर (जि. पुणे) : सरपंच निवडीदरम्यान वादग्रस्त ठरलेल्या हवेली तालुक्‍यातील रहाटवडे गावच्या सरपंच, उपसरपंचांची निवड आज (ता. 5 मार्च) तणावपूर्ण परिस्थितीत बिनविरोध झाली. सरपंचपदी रूपाली दत्तात्रेय चोरघे, तर उपसरपंचपदी वैशाली बाबाजी चोरघे यांची निवड झाली. कोणतीही अनुचित घटना घडू नये; म्हणून रहाटवडे येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पदाधिकारी निवडीनंतरही गावात 24 तास जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 

या पोलिस बंदोबस्तामध्ये जिल्हा कंट्रोल रूमचे दोन अधिकारी, रॅपिड ऍक्‍शन फोर्सचे एक पथक, तीन पोलिस निरीक्षक, तसेच राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी सांगितले. 

रहावटवडे गावाने ग्रामपंचायतीच्या सर्व 9 सदस्यांची बिनविरोध निवड केली होती. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी गावपातळीवरच सरपंच, उपसरपंच निवड करण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच निवडून आलेल्या पाच सदस्यांनी गावातून एकत्र बाहेर पडून बंडखोरी केली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला होता. त्यावरून गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी बाहेर गेलेले पाच सदस्य उपस्थित राहिलेच नाहीत, त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक पुरेसे सदस्य नसल्याने तहकूब करण्यात आली होती. ती शुक्रवारी (ता. 5 मार्च) पार पडली. 

सरपंच उपसरपंच निवडीसाठी रूपाली दत्तात्रेय चोरघे, वैशाली बाबजी चोरघे, अश्विनी मनोहर चोरघे, विद्या अरविंद दरडिगे, सुनीता महेश चोरघे, चैत्राली धनाजी गोरे, साधना जितेंद्र चोरघे, संतोष बबन कांबळे, ललिता महेंद्र चोरघे उपस्थित होते. सरपंचपदासाठी रूपाली चोरघे यांनी, तर उपसरपंचपदासाठी वैशाली चोरघे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी किशोर शिंगोटे व सहायक ग्रामसेवक विठ्ठल मांढरे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. 

या वेळी राष्ट्रवादीचे काका चव्हाण, नवनाथ पारगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पहिलवान दत्तात्रेय चोरघे व बाबाजी चोरघे यांनी सांगितले की, गाव पातळीवर ठरल्याप्रमाणे सरपंच, उपसरपंचांची निवड झाल्याने आता गावात कोणताही रोष अथवा वाद राहिलेला नाही. 

काका चव्हाण यांनीही ग्रामस्थांना उद्देशून कोणताही वादविवाद न करता एकत्र राहून गावच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com