सरपंच असावेत तर असे...! एकाने केली विहिरीची स्वच्छता, तर दुसऱ्याने गवत कापण्यास हाती घेतला विळा! 

या दोन युवा सरपंचांनी गावकऱ्यांची वाट न पाहता जनतेसाठी स्वतः काम करत जिल्ह्यातील युवा सरपंचांपुढे आदर्श उभा केला आहे.
One Sarpanch of Ambegaon taluka cleaned the well, while another cut the grass near the water tank
One Sarpanch of Ambegaon taluka cleaned the well, while another cut the grass near the water tank

पारगाव (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील अनेक गावांच्या सरपंचपदी युवक विराजमान झाले आहेत. सरपंच तरुण असले की त्यांच्या सामाजिक कामांचा उत्साह दाडंगा असतो. त्यांच्या मनात गावच्या विकासाबाबत वेगवेगळ्या कल्पना असतात. गावासाठी ते स्वतःला झोकून देऊन काम करतात. 

आंबेगाव तालुक्‍यातील धामणी येथील सरपंच सागर जाधव यांनीही गावच्या सार्वजनिक विहिरीत उतरून पाण्यात वाढलेले शेवाळ व कचरा काढून स्वच्छता केली. तसेच, पिंपळगाव-खडकी येथील सरपंच दीपक पोखरकर यांनी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये दूषीत पाणी जात असल्याने स्वतः हातात विळा घेऊन पाण्याच्या टाकीजवळील गवत काढून परिसराची साफसफाई केली. 

या दोन युवा सरपंचांनी गावकऱ्यांची वाट न पाहता जनतेसाठी स्वतः काम करत जिल्ह्यातील युवा सरपंचांपुढे आदर्श उभा केला आहे. 

धामणी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामागील भागिरथी या सार्वजनिक विहिरीवर गावठाण आणि अण्णा भाऊ साठे नगरमधील महिला कपडे धुवायला जातात. ओढ्याच्या कडेला असल्यामुळे त्या विहिरीमध्ये नेहमी भरपूर पाणी असते. वर्षभर कपडे धुणे किंवा जनावरांना पाणी पाजणे यासाठी तिथे नेहमी वर्दळ असते. 

परिसरातील महिलांनी काही दिवसांपूर्वी सरपंच सागर जाधव यांच्याकडे विहिरीत शेवाळ, कचरा, प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, कपडे साचले असून त्यामुळे पाणी खराब झाले आहे, अशी समस्या मांडली होती. महिलांनी मांडलेल्या समस्येची दखल घेऊन सरपंच सागर जाधव स्वतः दोरीच्या साह्याने विहिरीत उतरले. विहिरीतील पाण्यावर साचलेले शेवाळ, कचरा, प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, कपडे बाजूला केली. विहिरीची स्वच्छता करण्यासाठी त्यांना संतोष पंचरास व इतर मित्रांची मदत झाली. 

पिंपळगाव-खडकी गावच्या सरपंचपदी नुकतेच निवडून आलेले दीपक पोखरकर यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली की गावठाणात गढूळ व दूषित पाणी येत आहे. ते लगेच तातडीने पाण्याची टाकी व विंधनविहिरीच्या (बोअरवेल) परिसरात उपसरपंच वसंत राक्षे यांच्यासह गेले. संबंधित ठिकाणी गवत तसेच घाणीचे साम्राज्य होते. ही गंभीर बाब लक्षात येताच तातडीने गवत काढण्यासाठी कामगार पाहण्यास सुरूवात केली. परंतु कामगारांनी दोन, तीन दिवसानंतर गवत काढण्यासाठी येईन. माझ्याकडे काम आहे, असे सांगितल्यावर सरपंच पोखरकर यांनी स्वतः हातात विळा घेऊन उपसरपंच वसंत राक्षे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पाणी टाकीच्या परिसरातील गवत आणि घाण यांची साफसफाई करून पाइपलाइनचे गळती बंद करुन पाणीपुरवठा सुरळीत केला. 

अशा तरुण सरपंचांमुळे जिल्ह्यात हिवरे बाजार व राळेगणसिद्धीसारखी अनेक आदर्श गावे तयार व्हायला वेळ लागणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com