गुंड अप्पा लोंढे खून खटल्याची कारागृहातच होणार सुनावणी  - Notorious goon Appa Londhe murder case to be heard in jail | Politics Marathi News - Sarkarnama

गुंड अप्पा लोंढे खून खटल्याची कारागृहातच होणार सुनावणी 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहातच खटला चालण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

पुणे : आरोपींच्या मोठ्या संख्येमुळे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, तसेच कोरोनामुळे कुख्यात गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील संशयितांवर आरोप निश्‍चिती झाल्यानंतर येरवडा कारागृहातील न्यायालयातच खटला चालविला जाणार आहे. सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहातच खटला चालण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. येत्या 20 जानेवारीपासून सत्र व विशेष मोका न्यायाधीश ए. एस. सिरसीकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. 

या प्रकरणात मोकानुसार संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लोंढे याचा भविष्यात जामिनास, वाळूच्या व्यवहारात आणि इतर धंद्यांत अडसर होऊ नये; म्हणून आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

अनलॉकनंतर आरोपी निश्‍चिती करण्यात आलेलेही हे पहिलेच प्रकरण होते. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. विकास शहा कामकाज पाहत आहेत. 

याबाबत अप्पा लोंढे याचा मुलगा वैभव लोंढे (वय 22, उरुळी कांचन, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ता. 28 मे 2015 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना लोंढेचा खून करण्यात आला होता. 

या खटल्यात आरोपींची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालयात हजर करताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तसेच, न्यायालयात गर्दीदेखील होऊ शकते. त्यामुळे कोरोना आणि सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कारागृहातच या खटल्याची सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीशांसमोर कारागृहात पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे. प्रथमवर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर यापूर्वी अनेकदा सुनावणी झालेली आहे, असे मुख्य आरोपी गोरख कानकाटे याचे वकिल ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख