पुणे : "नेता म्हणून नव्हे; तर कार्यकर्ता म्हणून विधान परिषदेवर निवडून द्या' अशी भावनिक साद पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नीता ढमाले यांनी पदवीधर मतदारांना घातली आहे. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील तरुण मतदारांना ही साद भावली असून ढमाले यांनी संपूर्ण मतदारसंघ प्रचाराने ढवळून काढला आहे.
नीता ढमाले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा होती. महिला म्हणून पक्ष आपल्याला संधी देईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ढमाले यांनी स्वतः स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील पदवीधर मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातून आपल्या प्रचाराची झंझावाती सुरुवात करुन त्यांनी विरोधातील उमेदवारांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. पुण्यातील दिग्गज राजकीय मंडळींच्या आधी आपला निवडणूक अर्ज दाखल करुन त्यांनी आधीच आपल्या राजकीय ताकदीची दखल घ्यायला भाग पाडले आहे.
साताऱ्यात प्रीतिसंगम येथील (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांनी पदवीधर मतदारांशी संवाद साधला आहे. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी यशवंतराव चव्हाण यांनी ज्या प्रकारे समाजातील सर्व घटकांना, विशेषतः महिलांना संधी दिली, याची त्यांनी या वेळी माहिती दिली. आपणही त्यांच्याच विचारानुसार काम करून पदवीधरांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे कटिबद्ध राहू, असा विश्वास देऊन त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. साताऱ्यापाठोपाठ सांगली दौऱ्यातही त्यांच्या मतदार मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.
कोणताही राजकीय वारसा नसताना आपल्या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कामाच्या जोरावर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार विरोधकांनाही दखल घ्यायला भाग पाडणारा आहे. एक महिला ज्या ताकदीने प्रस्थापित राजकारणाला शह देण्यासाठी लढत आहे, ते पाहून सर्वच स्तरांतून ढमालेंच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.
मतदारसंघातील विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांशी असणारे त्यांचे सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजू आहे. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या पदवीधरांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडून निवडणुकीत आपल्या विजयाची दावेदारी केली आहे. मतदारांमध्येही प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांविषयी नाराजी असून नीता ढमाले यांच्या रूपाने एक नवा चेहरा पुणे पदवीधरला मिळेल, असा दावा त्यांचे निकटवर्तीय करत आहेत.

