पुण्यात पुन्हा लॉकडाउन नाहीच : जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, तो व्हिडिओ जुना  - No lockdown in Pune again : District Collector's explanation | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात पुन्हा लॉकडाउन नाहीच : जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, तो व्हिडिओ जुना 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याचा जुना व्हिडिओ शनिवारी (ता. 20 फेब्रुवारी) सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, लॉकडाउन होणार ही अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. 

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा संसर्ग वाढू नये, तो आटोक्‍यात राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्‍लासेस, शाळा-महाविद्यालये, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत.

मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश दिला आहे. 

ज्या भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येईल. तो परिसर पूर्वीप्रमाणेच म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. ठराविक कालावधीनंतर भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या नियमित कोरोना चाचण्या करण्यात याव्यात, असे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांमध्ये म्हटलेले आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर आज व्हायरला झालेला व्हिडिओ जुना आहे. त्यात जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याचे म्हटलेले आहे. पण, तो जुना व्हिडीओ असून लॉकडाऊन होणार ही अफवा आहे. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख