ते दोन हात ठरले अविश्वास ठराव स्थगित होण्यास कारणीभूत! - The no-confidence motion against Khed sabhapati Pokharkar was adjourned due to this reason | Politics Marathi News - Sarkarnama

ते दोन हात ठरले अविश्वास ठराव स्थगित होण्यास कारणीभूत!

राजेंद्र सांडभोर 
गुरुवार, 10 जून 2021

त्यानुसार कोर्टाने ही स्थगिती दिली आहे.

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधातील अविश्वास ठरावास मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. १० जून) स्थगिती दिली. ‘अविश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी दोन सदस्यांना जबरदस्तीने हात वर करायला लावण्यात आले’ यामुद्यावर न्यायमूर्ती  एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. त्याच्या पुष्ठ्यार्थ याचिकाकर्त्यांच्या वतीने सभागृहातील त्याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण न्यायालयास सादर केले होते. (The no-confidence motion against Khed sabhapati Pokharkar was adjourned due to this reason) 

शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे  ३१ मे रोजी पीठासीन अधिकारी असलेले खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज (ता. १० जून) सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने अविश्वास ठरावाच्या मंजुरीला स्थगिती दिली व पुढील सुनावणी २६ जून रोजी होणार असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. रोहन होगले यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनीच ही माहिती दिली. 

हेही वाचा : अविश्वास ठरावाच्या राजकारणास नाट्यमय कलाटणी : पोखरकरांची मोहितेंवर तात्पुरती मात

अविश्वास ठरावानंतर नवीन सभापती निवडीसाठी कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठराव मंजुरीला स्थगिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य, नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच सहलीला गेलेले आहेत. या स्थगितीच्या निर्णयामुळे आता त्यांचा मुक्काम वाढणार की ते सहलीवरुन परत येणार, याबाबतही लोकांना उत्सुकता आहे. 

सभापती पोखरकर यांच्यावर २४ मे रोजी, शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंड करीत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ आणि भाजपच्या एकमेव सदस्य, विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी पाठिंबा दिला होता.  त्यानंतर ३१ मे रोजी शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंडखोरी केल्याने पोखरकरांवरील अविश्वास ठराव सहज मंजूर झाला होता. त्यावेळी ज्योती अरगडे आणि अमोल पवार यांनी हा अविश्वास ठराव जबरदस्तीने मंजूर करण्यात आला आहे. आमच्या काही सदस्यांना जबरदस्तीने हात वर करायला भाग पाडले होते, असा आरोप केला होता. त्याच्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान मतदानाच्या वेळचा व्हिडिओ सादर करण्यात आला. त्यानुसार कोर्टाने ही स्थगिती दिली आहे.   

संजय राऊतांनी केली होती मोहितेंवर सडकून टीका  

दरम्यान, शिवसेनेचे बहुमत असतानादेखील, शिवसेनेच्याच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आणि यामागे आमदार मोहिते यांचा हात असल्याच्या संशयावरून शिवसेना चिडली होती. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राजगुरूनगर येथे येऊन आमदार मोहितेंवर थेट शरसंधान केले. आमदारांनीही त्यांना उपहासात्मक पद्धतीने प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हा वाद पेटलेला असतानाच आता अविश्वास ठरावाच्या मंजुरीला स्थगिती मिळाल्याने या विषयाला वेगळेच वळण मिळाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख