पालकमंत्र्यांचा राजीनामा हवा की उजनीचे पाणी?

या हाकेला प्रतिसाद देण्याची भूमिका राजकारण्यांनी घेतली पाहिजे.
Need to meet Uddhav Thackeray, Ajit Pawar to stop water going to Indapur
Need to meet Uddhav Thackeray, Ajit Pawar to stop water going to Indapur

करमाळा : राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा असला तरी सोलापूर जिल्ह्यातील या तीनही पक्षाचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते हे या निर्णयाविरोधात आहेत. हा निर्णय मागे घेण्यासाठी शिवसेनेच्या नेतेमंडळींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे घालून प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, तशी भूमिका अद्यापतरी कोणी मांडताना दिसत नाही. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या राजीनाम्याची मागणी करून आणि नुसत्या आंदोलनाचा फार्स करून काहीही होणार नाही. पालकमंत्र्यांचा राजीनामा हवा की इंदापूरला जाणारे पाणी रोखणे महत्वाचे, हे एकदा सोलापूरकरांना ठरवावे लागणार आहे. 

भरणे यांचे पालकमंत्री पद काढण्यापेक्षा इंदापूरच्या पाण्याच्या निर्णयावर अधिक भर येथील नेतेमंडळीनी देणे गरजेचे आहे. यात होणारे राजकारण बाजूला ठेऊन उजनीचे पाणी वाटप झालेले असताना आता पाणी उचलू नका, यासाठी येथील भूमिपुत्र आर्त हाक देत आहेत. या हाकेला प्रतिसाद देण्याची भूमिका राजकारण्यांनी घेतली पाहिजे.

भरणेंनी त्यांच्या मतदारसंघासाठी प्रयत्न केले

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे इंदापूरचे नेतृत्व करत असल्याने ते त्यांच्या मतदारसंघाला पाणी मिळविण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दत्तात्रेय भरणे हे नुसते इंदापूरचे लोकप्रतिनिधी नाहीत, तर ते सोलापूरचे पालकमंत्री आहेत याच मुद्यावर हा निर्णय सरकारला मागे घेण्यास भाग पाडू, असे सोलापूर जिल्हातील नेतेमंडळीना वाटते आहे. कोणताही लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार, तेच भरणे यांनी केले आहे.

करमाळ्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी

राज्य सरकारचा निर्णय झाल्यापासून इंदापूरला जाणाऱ्या पाण्याला राजकीय अधिकच रंग चढतो आहे. या विषयवार पालकमंत्री भरणे यांनी उजनीतील एक थेंबही पाणी घेऊन जाणार नाही, असे ठामपणे सांगितले असले तरी येथील कोणाचे या उत्तराने समाधान झालेले नाही. करमाळ्यातील 29 गावे उजनी धरणात गेली आहेत. तेथील शेतकऱ्यांचा मोठा त्याग या उजनीसाठी आहे. उजनीचे पाणी वाटप संपलेले असताना सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

आंदोलनाची तयारी

सोलापूर जिल्ह्यातून माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. कुर्डुवाडी येथेही याविषयी सर्वपक्षीय बैठक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत उजनीचे पाणी इंदापूरला जाऊ देणार नाही, अशी भूमिका या नेतेमंडळीनी मांडली असून भविष्यात आंदोलने करण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे.

भरणेविरोधकांना बळ

सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाला जबाबदार धरून पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी इंदापूरच्या पाणी निर्णया अगोदरपासूनच केली जात होती. त्यातच इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा शासकीय आदेश झाला. त्यामुळे पालकमंत्री भरणे यांच्याविरोधात अधिकच वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पडद्यामागून फिल्डींग लावणाऱ्या मंडळींना अधिकच बळ मिळाले असल्याचे सध्या तरी चित्र आहे. या वादात पालकमंत्र्यांचा राजीनामा हवा की इंदापूरला जाणाऱ्या पाण्याचा निर्णय मागे घेणे महत्त्वाचे हे सोलापूरकरांना आधी ठरवावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com